खुशखबर! एसटीचा प्रवास झाला कॅशलेस, कर्मचारी व प्रवाश्यांसाठी एसटी महामंडळांने लागू केल्या 'या' नव्या योजना
यानुसार येत्या काळात एसटीचा प्रवास कॅशलेस करता येणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले.
मुंबई: एसटी (ST) ने प्रवास करताना सुट्ट्या पैशांचा गोंधळ आता यापुढे सहन करावा लागणार नाही, कारण आता एसटीचा प्रवास देखील कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे. एसटीचा 71 वा वर्धापन दिन काल मोठया उत्साहात मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात (August Kranti Maidan) पार पडला यावेळी एसटी महामंडळाचे दिवाकर रावते (Divakar Ravte) यांनी कॅशलेस रिचार्ज कार्ड (Recharge Card) सोबतच अन्य अनेक नवीन नियमांची घोषणा केली. यापूर्वी रेल्वेच्या तिकीट लाईनमध्ये उभं राहू नये म्हणून प्रवाश्यांसाठी एटीव्हीहीएम (ATVM) सुविधा सुरु करण्यात आली होती याच पार्श्ववभूमीवर आता एसटी मध्ये देखील प्रवासी तिकीट काढण्यासाठी नवीन रिचार्जकार्ड उपलब्ध होणार असल्याचे काळ रावते यांनी सांगितले.
या रिचार्ज कार्डची किंमत 50 रुपये इतकी ठेवण्यात आले असून यावर किमान 300 तर कमाल 5000 रुपयांचा रिचार्ज करता येणार आहे. या कार्डाचे मुख्य वैशिष्ट्य असे की प्रवासी तिकिटासोबतच इतर खरेदीसाठी देखील तुम्हाला हे कार्ड वापरता येऊ शकते.एसटीने सुरु केलेले हे रिचार्ज कार्ड पूर्णतः हस्तांतरणीय असणार आहे म्हणजेच तुम्ही हे कार्ड तुमच्या नातेवाईक, मित्र मैत्रणी किंवा कुटुंबासोबत शेअर करून देखील वापरू शकता. MSRTC Mega Bharti 2019 मध्ये 932 महिलांनी केले ST बस ड्रायव्हर पदासाठी अर्ज, पहिल्यांदाच येणार एसटीचं सारथ्य महिलांच्या हाती
एसटीचा खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी इंधन बदल
एसटी महामंडळातर्फे पार पडलेल्या कार्यक्रामात एसटीचा खर्च आवाक्यात ठेवण्यासाठी देखील काही संकल्पना मांडण्यात आल्या. यातीलच एक भाग म्हणजे यापूर्वी डिझेल किंवा पेट्रोल वर धावणाऱ्या एसटी गाड्यांसाठी यापुढे एलएनजी (लिक्विफाईड नॅचरल गॅस) चा वापर करण्यात येईल. यामुळे एसटीची तब्बल 800 कोटींची बचत होणार असल्याचे देखील मानण्यात येत आहे. या बचतीतून प्रवाश्यांसाठी उपयुक्त बदल घडवण्याचा मानस रावते यांनी व्यक्त केला.
कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!
प्रवाश्यांसोबतच एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील विविध योजना येत्या काळात राबिवण्यात येणार आहेत. सातव्या वेतन वाढीच्या सोबतच मध्यंतरी देण्यात आलेल्या अंतरिम वेतन वाढीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे चांगले दिवस लवकरच येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याचप्रमाणे एसटीच्या अधिकारी पदांसाठी लवकरच बढती देण्यात येणार असल्याचे देखील रावते यांनी सांगितले. यासंदर्भात अद्याप सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणे बाकी आहे मात्र त्यांनतर 500 ते 600 कर्मचाऱ्यांना बढती आण्याची शक्यता आहे. याशिवाय लिपीकपदाच्या भरतीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी 25 टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या अंतर्गत होणाऱ्या कारवायांनमधून आता अवघ्या सहा महिन्याच्या अवधीतच सुटका मिळणार आहे.निवृत्तीनंतर तर कर्मचाऱ्यांच्या मागे कोणत्याही चौकशीचा ससेमीरा असता कामा नये, यासाठी कार्यपद्धतीत महतवाचे बदल करणारी सुधारीत शिस्त आणि आवेदन कार्यपद्धती रावते यांनी कार्यक्रमाच्या दरम्यान जाहीर केली.
एकेकाळी प्रवाश्यांची पहिली पसंती असलेली एसटी सेवेकडे मागील काही काळात प्रवाश्यांनी पाठ फिरवली होती. मात्र आता या नाव्हीईन नियम व योजनांमुळे एसटीला लवकरच पुर्वव्रत सुगीचे दिवस येणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.