SSC Board Exam 2020: दहावीचा 23 मार्चचा पेपर लांबणीवर; 31 मार्च नंतर जाहीर होणार परीक्षेची नवी तारीख
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मीडियाला माहिती देताना 31 मार्च नंतर राज्यातील परिस्थिती पाहून भूगोल विषयाच्या पेपरची नवी तारीख जाहीर केली जाईल अशी माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता विळखा पाहता खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्यात सुरू असलेली दहावीची परीक्षा देखील या कारणामुळे खंडित करण्यात आली आहे. 23 मार्च दिवशी राज्यात होणारा महाराष्ट्र राज्य एसएससी बोर्डाचा शेवटचा भूगोल विषयाचा पेपर आता रद्द करण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मीडियाला माहिती देताना 31 मार्च नंतर राज्यातील परिस्थिती पाहून भूगोल विषयाच्या पेपरची नवी तारीख जाहीर केली जाईल अशी माहिती दिली आहे. दरम्यान विद्यार्थी आणि पालकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पूर्ण काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. काल वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शिक्षण मंडळाच्या 1-8 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. पहिली ते आठवी च्या परीक्षा रद्द; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.
भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 270 च्या पार गेली आहे. तर महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रूग्ण आहेत. हा आकडा 63 वर पोहचला आहे. त्यामुळे आता सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जातली जात आहे. यापूर्वी राज्यातील सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाने त्यांच्या 10,12 वीच्या परीक्षा सर्वत्र रद्द करण्यात आल्या आहेत. 31 मार्चनंतर त्यांची नवी तारीख जाहीर केली जाणार आहे.
यंदा राज्यातील दहावीच्या परीक्षेला 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते तर सुमारे 4979 परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र बोर्डाकडून 9 विभागीय मंडळातून म्हणजेच पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण मध्ये त्याचे आयोजन केले होते. मात्र आता मंडळात दहावीचा उर्वरित पेपर रद्द करण्यात आला आहे.