Deepali Chavan Suicide Case: वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी श्रीनिवास रेड्डीला अटक

यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांचाही समावेश होता.

RFO Deepali Chavan (PC - ANI)

Deepali Chavan Suicide Case: वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (RFO Deepali Chavan) आत्महत्या प्रकरणातील निलंबित मुख्य वनसंरक्षक आरोपी श्रीनिवास रेड्डीला (Chief Forest Officer Srinivas Reddy) अटक करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. परंतु, अमरावती पोलिसांना बुधवारी ते नागपुरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक नागपूरमध्ये दाखल झाले. नागपूर गुन्हे शाखा आणि स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर श्रीनिवास रेड्डीला नागपूरात अटक करण्यात आली.

दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती. ज्यात त्यांनी आपण वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. (वाचा - Deepali Chavan Suicide: वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांची आत्महत्या, पिस्तूलातून स्वत:वर झाडली गोळी)

या प्रकरणी DFO विनोद शिवकुमार यांना नागपूरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले होते. आज त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप केले होते. यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांचाही समावेश होता.