Bhima Koregaon Case: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वरावरा राव आणि शोमना सेन यांनी मागितलेला जामीन नामंजूर
या पार्श्वभूमीवर दोघांनीही अंतरिम जामीनाची मागणी केली होती. मात्र त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला नाही.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या वरावरा राव आणि शोमना सेन या दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज आज (31 मार्च) मुंबईच्या Special NIA कोर्टाने फेटाळला आहे. दरम्यान राज्यात कोरोना व्हायरसमुळे कोव्हिड 19 हा आजार पसरत आहे. या पार्श्वभूमीवर दोघांनीही अंतरिम जामीनाची मागणी केली होती. मात्र त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला नाही. दरम्यान एल्गार परिषदेतील भाषण आणि त्यानंतर पेटलेला हिंसाचार याप्रकरणी हे दोन्ही आरोपी असून सध्या भीमा कोरेगाव हिंसाचाराचा तपास पुणे कोर्टाकडून एनआयए या केंद्रीय यंत्रणेकडे सोपावण्यात आला आहे. दरम्यान 16 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात प्राध्यापक आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांचाअटकपूर्व जामीन (anticipatory bail)अर्ज नाकारला होता. सोबतच त्यांना स्वतःहून शरण जाण्यास 3 आठवड्यांची मुदत देण्यात दिली होती. त्यांना त्यांचा पासपोर्टदेखील सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्या न्यायालयीन प्रकरणांच्या सुनावणीदेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण पुणे पोलिसांकडून काढून NIA कडे देण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, एल्गार परिषदेच्या डिसेंबर 31, 2017 च्या संध्याकाळी पुण्यामध्ये झालेल्या सभेला माओवाद्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप लावण्यात आला होता. या सभेत काही चिथावणीखोर भाषणं झाली आणि त्यामधूनच 2018 साली 1 जानेवारी दिवशी सकाळी हिंसाचार भडकला असे सांगण्यात येते. मात्र आता या प्रकरणात 20 पेक्षा अधिक लोकांची कसून चौकशी सुरू आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपी वरावरा राव यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्कमधील डाटा पुन्हा मिळवण्यासाठी काही दिवसांपूर्वी पुणे पोलिस अमेरिकेतील ब्युरो (FBI)च्या मदतीने तपास करणार होते. वरावरा राव हे कवी देखील आहेत. माओवादी चळवळीचे कट्टर समर्थक त्यांची ओळख आहे. वरावरा यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली होती तर यापूर्वीदेखील अनेकदा त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे.