International Yoga Day 2023: आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये सोलापुरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांची माहिती
केंद्रीय संचार ब्यूरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, योग समन्वय समिती आणि जिल्हा प्रशासन, सोलापूर यांच्या वतीने 21 जून रोजी साजरा होणाऱ्या 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
निरोगी आरोग्यासाठी 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (International Yoga Day) कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सोलापुरकरानी सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांनी योग समन्वय समितीच्या बैठकीत केले. केंद्रीय संचार ब्यूरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, योग समन्वय समिती आणि जिल्हा प्रशासन, सोलापूर यांच्या वतीने 21 जून रोजी साजरा होणाऱ्या 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री पाटील बोलत होते. (हे देखील वाचा: Akashvani Pune Kendra: आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग 19 जून पासून बंद)
यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपजिल्हाधिकारी चारुलता देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, तहसिलदार अंजली कुलकर्णी, योग समन्वय समितीचे निमंत्रक मनमोहन भुतडा, समितीचे समन्वयक सुधा अळळीमोरे आणि क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री चव्हाण म्हणाले की, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जागतिक स्तरावर मोठया प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी देशभर माघील 100 दिवसापासून ‘योग महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने भारत सरकारची सर्व मंत्रालयाने उत्सफुर्तपणे सहभाग घेउन रोज ‘कॉमन योग प्रोटोकॉल’ प्रमाणे सराव करत आहेत. वसुधैव कुटुंबकमसाठी योग ही यावर्षीची संकल्पना आहे. यावर्षीचा हा नववा आंतरराष्ट्रीय योग दिन हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर दि.21 जून 2023 रोजी सकाळी 7 ते 8 यावेळेत साजरा करण्यात येणार आहे. केंद्रिय संचार ब्युरोच्या वतीने दिनांक 20 ते 22 जून पर्यंत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहामध्ये मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये भारतीय योग, विविध योगासने, प्राणायम, ध्यान याविषयी माहिती देणारे चित्र व मजकुरासह लोकांना बघता येणार आहे. सदर प्रदर्शन सकाळी 10 ते 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.
या बैठकीसाठी जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा क्रीडा कार्यालय, नायब तहसिलदार सामान्य शाखा, संचालक राष्ट्रीय सेवा योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय, सोलापूर मनपा, राज्य राखीव दल, एन सी सी, नेहरू युवा केंद्र संघटन, महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड कार्यालय, हरिभाई देवकरण प्रशाला, पतंजली योग पीठ, योग असोसिएशन, योग सेवा मंडळ, विवेकानंद केंद्र, योग साधना मंडळ, भारतीय योग संस्था, योग परिषद, हार्टफुलनेस इन्स्टिटयुट श्रीरामचंद्र मिशन, गीतापरिवार सर्व कल्याण योग- स्काय, आणि रूद्र ॲकॅडमी ऑफ मार्शल आर्ट योग इत्यादी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.