सोलापूर: Coronavirus संक्रमित कुटुंबाच्या जनावराची टेंभुर्णी पोलीस कर्मचाऱ्यांकडून देखभाल; पाहा Video
हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील टेंभुर्णी पोलीस (Tembhurni Police) ठाणे कर्मचाऱ्यांनी खाकीतील अनोख्या मानवतेचे दर्शन घडवले आहे. माढा तालुक्यातील अकोले बुद्रुक येथील एका कुटुंबातील 3 व्यक्तिंना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला. त्यामुळे कुटुंबातील सर्वांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तिघांवर उपचार सुरु असून इतर लोकांची तपासणी सुरु आहे. या शेतकरी सुटुंबातील सर्वच लोक हॉस्पिटलमध्ये असल्याने त्यांच्या घरातील जनावरांची देखभाल टेंभुर्णी पोलीस कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
टेंभुर्णी पोलिसांच्या या मानवतेचा व्हिडिओ सोलापूर पोलिसांनी @SpSolapurRural या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे. यात काही युजर्सनी पोलिसांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसऱ्या एका युजर्सने 'खुप छान कार्य करत आहेत महाराष्ट्र पोलिस जय महाराष्ट्र' असे म्हटले आहे. आणखी एक युजर्स म्हणतो 'किती छान काम करत आहात! अभिमान वाटतो तुमचा!'. अशीच प्रतिक्रिया देताना आणखी एक युजर्स म्हणतो की, 'आपले कौतुक करावे तितके कमीच आहे.' (हेही वाचा, वारकऱ्यांनी आषाढीवारीकरिता पंढरपुरात येऊ नये यासाठी पोलीस नाईक प्रसाद मनोहर औटी यांनी बनविलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; Watch Video)
टेंभुर्णी पोलीस ट्विट
युजर्सच्या प्रतिक्रिया
महाराष्ट्र पोलिसांच्या अशाच चांगल्या कामगिरीचे अनेकदा दर्शन झाले आहे. महाराष्ट्र पोलीस नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. सध्याचा जमाना हा थोडा सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा व्हिडिओ काढून तो लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र पोलिसही अशाच प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करत आपले कार्य लोकांपर्यंत पोहोचवताना दिसतात.