सोलापूर महापालिका मध्ये कोव्हिड केअर सेंटर मध्ये काम करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी ते वॉर्डबॉर्य पर्यंत 216 जागांसाठी भरती; 20 मे पर्यंत दाखल करू शकता ऑनलाईन अर्ज!
पहा कसा आणि कुठे करू शकाल अर्ज?
Solapur Municipal Corporation Recruitment 2020: कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता आता महापालिकेच्या रूग्णालयांवर आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. अशामध्ये रिक्त जागांवर कोव्हिड योद्धांची तात्काळ भरती करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. सोलापूर महापालिकेमध्येही कोव्हिड केअर सेंटरमध्ये कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी खास यंत्रणा उभी केली जात आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, वॉर्डबॉय, डाटा एंट्री ऑपरेटर्स ते लॅब टेक्निशियन अशा विविध पदांवर सुमारे 216 जागांसाठी तात्पुरती भरती केली जाणार आहे. दरम्यान राज्यावर आलेलं कोरोना संकट परतवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना 20 मेच्या संध्याकाळ पर्यंत आपला अर्ज दाखल ऑनलाईन माध्यमातून दाखल करायचा आहे. दरम्यान त्यासाठी आवश्यक अर्ज solapurcorporation.gov.in या पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र तो भरल्यानंतर smcgados@gmail.com वर पाठवणं आवश्यक आहे.
सोलापूर महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल ऑफिसरच्या 45 च्या जागा, स्टाफ नर्सच्या 92, फार्मासिस्टच्या 5, लॅब टेक्निशनच्या 13, ईसीजी टेक्निशनच्या 5, एक्स रे टेक्निशनच्या 5, अॅम्ब्युलंस ड्रायव्हरच्या 15, वॉर्ड बॉयच्या 31 तर डाटा एंट्री ऑपरेटर्सच्या 5 जागांवर भरती होणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवाराचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असू नये अशी अट आहे. ही भरती तात्पुरत्या स्वरूपात पुढील 6 महिन्यांसाठी करार पद्धतीने मानधन तत्त्वावर असेल. दरम्यान पात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट 22 मे दिवशी जाहीर केली जाणार आहे. प्रत्येक पदासाठी वेगळे पात्रता निकष आणि भत्ता असल्याने त्याबाबतची अधिकृत जाहिरात आणि माहिती सोलापूर महानगरपालिका अंतर्गत Covid Care व Covid पदभरती PFD येथे तुम्ही पाहू शकता.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ : 20 मे संध्याकाळी 5 वाजता
मेरिट लिस्ट जाहीर होणार : 22 मे 2020
दरम्यान कोव्हिड योद्धा म्हणून सोलापूरच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये नियुक्त केल्या जाणार्या मेडिकल ऑफिसरचे मानधान 50 हजार रूपये, आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसरचे मानधन 40,000 रूपये तर वॉर्ड बॉयला 10 हजार रूपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील या वॉर व्हर्सेस व्हायरस मध्ये आरोग्य यंत्रणेचा एक भाग होण्यास इच्छुक असाल तर लवकर अर्ज दाखल करायला विसरू नका.
महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 33053 च्या पार आहे. तर कोरोनामुळे मृत पावलेले
1198 जण आहेत. 7688 जणांनी कोरोनावर यशस्वी मात करून ही लढाई जिंकली आहे.