Ram Satpute Vs Praniti Shinde: काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचे पत्र, भाजप Candidate राम सातपुते यांच्याकडून 'जय श्रीराम' म्हणत प्रत्युत्तर
सोलापूर लोकसभा मतदारसंघ (Solapur Lok Sabha Constituency) या वेळी दोन तरुण आणि मातब्बर नेत्यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आहे. या मतदारसंघात लोकसभा निवडणूक 2024 साठी (Solapur Lok Sabha Election) काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगतो आहे. दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसचा पंजा घेऊन प्रणिती शिंदे (Praniti Shinde) तर भाजपचे कमळ घेऊन राम सातपुते (Ram Satpute) रिंगणात आहे. उल्लेखनीय असे की, दोन्ही उमेदवार विद्यमान आमदार आहेत. त्यामळे लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचार सुरु केला आहे. दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर पत्र लिहीत थेट आवाहन केले आहे. ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
प्रणिती शिंदे यांनी पत्रात काय म्हटले?
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावे लिहिलेल्या पत्रात प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे की, मा. राम सातपुते जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे! सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच ह्या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळालीये त्या बद्दल शुभेच्छा देते. लोकांचे प्रश्न,त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे. पुढील ४० दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते.. सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते. - प्रणिती सुशीलकुमार शिंदे (हेही वाचा, Pratibha Dhanorkar: सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात चंद्रपूरात प्रतिभा धानोरकर रिंगणात, काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर)
एक्स पोस्ट
@RamVSatpute जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे! pic.twitter.com/ZQHXT7aLAE
— Praniti Shinde (@ShindePraniti) March 25, 2024
सोलापूरात तगडी लढत
राम सातपुते यांच्याकडूनही प्रत्युत्तर
प्रणिती शिंदे यांच्या पत्रावर राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिले आहे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, आ. प्रणिती शिंदेजी, जय श्रीराम...! मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय. मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्षं राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय. राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. वंदे मातरम्....! आपला विनीत, राम सातपुते (हेही वाचा, Nitin Gadkari On Loksabha Election 2024: 'मी ही निवडणूक 5 लाखांहून अधिक मतांनी जिंकेन'; नितीन गडकरी यांचा दावा)
एक्स पोस्ट
प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते ही लढत चांगलीच तगडी होणार असे दिसते. प्रणिती शिंदे या काँग्रेस कार्यकर्त्या, आमदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. विद्यमान आमदार म्हणूनत्यांची कामगिरीही चांगली असल्याचे मानले जाते. दुसऱ्या बाजूला राम सातुपते हे देखील विद्यमान आमदार आहेत. ते सोलापूर येथील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. ते भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2024 01:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

