Dr. Dhavalsinh Mohite Patil: डॉ. धवलसिंह मोहिते पाटील करणार काँग्रेस पक्षात प्रवेश
शिवाय काँग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनाही बऱ्यापैकी बळ मिळणार आहे.
काँग्रेस (Congress) पक्षाची स्थिती राज्यात नाजूक असताना पक्ष पुन्हा एकदा कात टाकण्याच्या विचारात आहे. सोलापूर (Solapur ) जिल्ह्यातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील (Dhawalsinh Mohite Patil) हे काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. हा पक्षप्रवेश उद्या (28 जानेवारी) पार पडण्याची शक्यता आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांचे पुतणे आहेत. गेल्या काही काळात धवलसिंह यांना विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाते.
डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे खरे तर मूळचे शिवसेना पक्षातील नेते. युतीधर्म पाळताना शिवसेनेत धवलसिंह यांना फारसा वाव मिळाला नाही. त्यातच विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजिसिंह मोहिते पाटील यांनी. त्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षातून बाहेर पडत आपल्या जनसेवा संघटनेचे काम करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा, वसंत गीते, सुनील बागुल यांची शिवसेना पक्षात घरवापसी; संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये पक्ष प्रवेश)
प्राप्त माहितीनुसार, काँग्रेसच्या मुंबई येथील मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. या वेळी अनेक काँग्रेस नेतेही उपस्थित राहणार आहेत. धवलसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत सांगायचे तर ते माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. याशिवाय त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष पदही आहे. एकेकाळी धवलसिंह हे थेट शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असत.
धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास सोलापूर काँग्रेसमध्ये आलेली मरगळ झटकण्यास मदत होणार आहे. शिवाय काँग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनाही बऱ्यापैकी बळ मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अशा वेळी जर काँग्रेस पक्षात कोणी प्रवेश करत असेल तर त्याचे स्वागत होणे स्वाभाविक आहे.