Kalyan Marathi Family Assault Case: कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला केल्याप्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लासह सहा जणांना 6 दिवसांची पोलीस कोठडी
न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
Kalyan Marathi Family Assault Case: कल्याणमधील (Kalyan) आजमेरा हाइट्स इमारतीत (Azmera Heights Building) मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) सह सहा जणांना शनिवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात (Kalyan District Sessions Court) हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
धूप जाळण्यावरून झाला वाद -
प्राप्त माहितीनुसार, या घटनेत अभिजीत देशमुख आणि इतर दोन तरुणांवर धूप जाळण्याच्या वादातून हल्ला करण्यात आला होता. सोसायटीत राहणाऱ्या शुक्ला यांनी बाहेरून काही तरुणांना बोलावून अभिजीत देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून देशमुख यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा -Kalyan Marathi Family: 'मराठी व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे निलंबन, कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही'- CM Devendra Fadnavis)
मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला अटक -
दरम्यान, कल्याण खडकपाडा पोलिसांनी देशमुख कुटुंबावर हल्ला केल्याप्रकरणी रंगा उर्फ दर्शन बोराडे आणि सुमित जाधव यांना अटक केली होती. त्यानंतर मुख्य आरोपी शुक्ला यालाही अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता, विवेक जाधव आणि पार्थ जाधव यांना ताब्यात घेण्यात आले होते. शनिवारी सहाही आरोपींना दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (हेही वाचा -Kalyan Marathi Family: मराठी माणसाचा सन्मान कायम राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल: अजित पवार)
तथापी, शनिवारी कल्याण खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्ला याची खाजगी गाडी जप्त केली आहे. शुक्ला हा सोसायटीतील रहिवाशांना सनदी अधिकारी असल्याचे सांगून धमकावत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तसेच तो आपल्या खाजगी गाडीवर अंबर दिवा लावत असे. आता पोलिसांनी शुक्ला याची गाडी तसेच अंबर दिवा जप्त केला आहे.