Sindhudurg ZP President Election 2021: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज निवडणूक; भाजप खासदार नारायण राणे यांची कसोटी
राणे समर्थक असलेल्या भाजपच्या समिधा नाईक यांनी अध्यक्षदाचा राजीनामा दिल्याने आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.
महाविकास आघाडीने सांगली, जळगाव महापालिकेच्या निवडणूकी मध्ये भाजपाला धक्का देत सत्ता परिवर्तन घडवून आणण्याची किमया साधली आहे. आता सिंधुदुर्ग मध्ये आज जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक (Sindhudurg Zilla Parishad President Election) होणार आहे त्यामध्येही महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) आपला झेंडा फडवणार का हे पाहणं उत्सुकतेचे आहे. दरम्यान तळकोकणात शिवसेना (Shiv Sena) विरूद्ध नारायण राणे (Narayan Rane) हा संघर्ष नेहमीच पहायला मिळतो. आणि आज यो सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी अधिक तीव्र होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेवर भाजपा खासदार नारायण राणे यांचे वर्चस्व आहे. 50 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये राणे समर्थकांची संख्या अधिक आहे.
आज दुपारी 3 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मागास यंदा (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. 4 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणूकीमध्ये एनसीपी आणि कॉंग्रेसच्या तिकीटावर 27 सदस्य, शिवसेनेचे 16 तर भाजपचे 7 सदस्य निवडून आले होते. पण आता राणेंनी कॉंग्रेसला सोडून भाजपाची वाट धरली आहे त्यामुळे आज सिंधुदुर्गात नारायण राणेंची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे. Jalgaon Municipal Corporation Election 2021 Result: जळगाव महापालिकेत शिवसेना विजयाचा 'सांगली पॅटर्न', भाजपची सत्ता गेली; गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळले.
सांगली, जळगाव मध्ये महापालिकेच्या निवडणूकीमध्ये राजकीय खेळी खेळत ऐन मतदानाच्या मोक्याला महाविकास आघाडीने 'भाजपा'चा मोठा गेम केल्याचं पहायला मिळालं आहे त्यामुळे आता हीच पुनरावृत्ती सिंधुदुर्गात होणार का? या बाबत कमालीची उत्सुकता आहे. नुकत्याच रत्नागिरी जिल्हापरिषद अध्यक्ष पदी विक्रांत जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.