सिंधुदुर्गात एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीची हत्या, आरोपी साहिल धुरीला अटक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वर्दे कडावल गावात एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणी दामिनी पालव हिची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. फरार झालेला आरोपी साहिल धुरी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रात्री त्याच्या घरातून अटक केली आहे.

सिंधुदुर्गात एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीची हत्या, आरोपी साहिल धुरीला अटक
Representational Image (File Photo)

कुडाळ तालुक्यातील वर्दे कडावल गावात एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणी दामिनी पालव हिची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. घटनेनंतर फरार झालेला आरोपी साहिल धुरी याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. वडाळ्यात SIWS कॉलेजजवळ तरुणावर गोळीबार, OLA कॅबमधून आलेले 2 हल्लेखोर तासाभरात अटकेत!

आरोपीला घरातून ताब्यात घेतले

पोलिसांनी साहिल धुरी याला रात्री त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्या वेळी आरोपीचे रक्ताने माखलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत.

सोशल मीडियावरील ओळखीतून एकतर्फी प्रेम

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीनंतर साहिलला दामिनीबद्दल एकतर्फी प्रेम वाटू लागले होते. दामिनीने त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला नव्हता. दरम्यानच्या काळात तिचे लग्न ठरल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

घटना कशी घडली

आरोपी साहिल हा घटनास्थळी दामिनीची वाट पाहत थांबला होता. दामिनी महाविद्यालयातून एसटीने प्रवास करून गावात उतरली आणि घरी जात असताना त्याने तिला अडवले. त्याने तिच्याकडे प्रेम स्वीकारण्याचा आग्रह धरला. दामिनीने नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.

पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण क्रम तपासानंतरच स्पष्ट होईल. नक्की वाचा: नोएडा मध्ये नूडल्समुळे नाही, तर प्रॉपर्टी वादातून आत्महत्या; कौटुंबिक वादातून आत्महत्येचा पोलिसांचा संशय .

महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

या घटनेमुळे महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकतर्फी प्रेमातून यापूर्वीही राज्यात गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्या असून, त्यामध्ये अनेकदा मुलींना जीव गमवावा लागला आहे.

सोशल मीडियाचा वापर करताना कोणाला मित्रयादीत जोडावे आणि कोणाशी संवाद साधावा, याची पडताळणी करणे गरजेचे असल्याचेही या घटनेतून अधोरेखित होते.

(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2026 04:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).