धक्कादायक! नदीपात्रात अंत्यसंस्कार सुरु असताना अचानक आलेल्या पुरात मृतदेह गेला वाहून; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
ही घटना यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वाणी तालुक्यात सोमवारी सायंकाळी घडली आहे.
नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार सुरु असताना अचानक आलेल्या पुरात एका मृत व्यक्तीचा मृतदेह वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वाणी तालुक्यात सोमवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे. मयताचे सोमवारी दुपारी निधन झाल्यानंतर सायंकाळी त्याच्यावर निगुर्डा नदीपात्रात अंतसंस्कार करण्यात आले. परंतू, त्यावेळी नदीच्यापात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. ज्यामुळे सरणासह त्यावरील मृतदेहसुद्धा वाहून जायला लागला. मात्र, त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी मृतदेह पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो पुरात वाहून गेला आहे. या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
पळसोनी येथील सीताराम बापूराव बेलेकर असे मृताचे नाव आहे. सीताराम यांचे सोमवारी दुपारी अपघाती निधन झाले होते. त्यानंतर शवविच्छेदनानंतर सायंकाळी त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला होता. गावालगत निगुर्डा नदीपात्र पूर्णपणे कोरडे असल्याने तिथेच अंत्यसंस्कार करण्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ठरवले. त्यानुसार, काही नातेवाईक आणि स्थानिक लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते. दरम्यान, चितेला अग्नी दिल्यानंतर काही वेळात नदीपात्रात अचानक पाण्याच्या प्रवाहाचा लोंढा आला. काही क्षणांतच नदी दुथडी भरून वाहू लागली. त्यामुळे उपस्थित लोकांची नदी पात्राबाहेर पडण्यासाठी चांगलीच धावपळ झाली. या पुरात सरणासह त्यावरील मृतदेहसुद्धा वाहून जायला लागला. जमलेल्या नागरिकांनी मृतदेह पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुरात वाहून गेला. या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. हे देखील वाचा- Mumbai Rain Update: आजपासून पुढील 48 तास मुंबई सह राज्यात विजांसह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा
यवतमाळ जिल्ह्यात 15 जूनला दुपारी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला होता. यामुळे नाल्यांना पूर तर काही शेतात पावसाचे पाणी सुद्धा साचले आहे. जिल्ह्याच्या पुसद आणि नेर तालुक्याच्या ग्रामीण भागात हा पाऊस कोसळला. पेरणी केली त्या भागात पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पाणी साचले तर कुठे शेती कामाची लगबग सुरू झाली आहे.