Shivshahi Bus Accident: नाशिक-औरंगाबाद शिवशाही बसला अपघात; एकाचा मृत्यू
नाशिक-औरंगाबाद शिवशाही बसवरील चालकाच नियंत्रण सुटल्याने उड्डाणपुलाखाली असलेल्या 44 नंबर खांब्यावर ही बस आदळली.
शिवशाही बस (Shivshahi Bus) अपघाताची अजून एक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रात मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Expressway) शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण जखमी आहेत. हा अपघात नाशिक (Nashik) मधील महामार्गा जवळ असलेल्या तपोवन कॉर्नर (Tapovan Corner) येथील आहे.
नाशिक-औरंगाबाद शिवशाही बसवरील चालकाच नियंत्रण सुटल्याने उड्डाणपुलाखाली असलेल्या 44 नंबर खांब्यावर ही बस आदळली. दरम्यान या बसअपघातामध्ये एका दुचाकीला देखील धडक बसली. त्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातामध्ये 6 जण जखमी आहेत. जखमींवर नजिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान महाराष्ट्रात यापूर्वी देखील शिवशाही बसला अपघात होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या बसद्वारा सुरक्षित प्रवासाबद्दल अनेकदा प्रवाशांच्या मनात धास्ती असते. शिवशाही बसचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना कराव्या अशी मागणी देखील प्रवाशांकडून अनेकदा करण्यात आली आहे.
खासगी बस वाहतूकीस टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही बस सेवा सुरु केली आहे. ही बस पूर्ण पणे वातानुकुलीत असते. सर्वसामान्य ग्राहकांनाही वातानुकुलीत बसने प्रवास परवडावा यासाठी राज्य सरकारने ही सेवा सुरु केली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, शहरांसह राज्यातील काही महत्त्वपूर्ण शहरांमध्ये ही बस विना वाहक विना थांबा प्रवास करते. दीर्घ पल्ल्याच्या बसमध्ये वाहक असतो.