Pune: शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ; आक्रमक शिवसैनिकांनी फोडले इन्शुरन्स कंपनीचे ऑफिस (Video)

याच रागातून शिवसैनिकांनी पुण्यातील इफ्को टोकियो जनरल विमा कंपनीच्या (IFFCO Tokio General Insurance Company) कार्यालयाची तोडफोड केली आहे.

शिवसेनेने केलेली तोडफोड (Photo Credit : Twitter)

कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), पुणे (Pune) जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक लोकांच्या संसाराची वाताहत झाली, तर अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अशात सरकारने मदतीची घोषणा केली आहे मात्र विमा कंपन्यांनी हात वर केलेले दिसून येत आहेत. पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे मात्र विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत. याच रागातून शिवसैनिकांनी पुण्यातील इफ्को टोकियो जनरल विमा कंपनीच्या (IFFCO Tokio General Insurance Company) कार्यालयाची तोडफोड केली आहे. सध्या या तोडफोडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओ -

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रोडवर इफ्को टोकिओ कंपनीचे ऑफिस आहे. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिकांचा विमा काढूनही विमा कंपन्या भरपाई देण्यास चालढकल करत होत्या, म्हणून शिवसनेने तोडफोडीचे आंदोलन केले. शिवसेनने याआधी अनेकवेळा शाब्दिक इशारा दिला होता, मात्र शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस ढासळत असल्याने आज रागाच्या भरात विमा कंपनीचे ऑफिस तोडण्यात आले. (हेही वाचा: Kolhapur: पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार संपूर्ण कर्जमाफी; कर्ज नसलेल्यांना तिप्पट मदत)

शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे ऑफिस फोडले आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीकविम्याची रक्कम देण्यात यावी यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ अधिकाऱ्यांना भेटण्यास गेले होते. मात्र यावेळीही अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. दरम्यान, नुकतेच मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीचा तडाखा बसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून मिळणार आहे. तीन ते चार दिवसांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.