MNS New Flag: मनसेच्या नव्या झेंड्यावर येणार 'शिवराजमुद्रा'? 23 जानेवारीला राज ठाकरे करणार अनावरण
भगवा रंग आणि शिवराजमुद्रा हे या गोष्टीचे संकेत देत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाचा झेंडा बदलणार अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. त्यामुळे नव्या झेंडाचा रंग कसा असेल अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. येत्या 23 जानेवारीला मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते या नव्या झेंड्याचे अनावरण होणार आहे. ABP माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, मनसेच्या नवा झेंडा हा भगव्या रंगाचा असून त्यावर शिवराजमुद्रा असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरीही मिळालेल्या माहितीच्या आधारे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मनसेच्या या नव्या झेंड्याचे रुप पाहिलं, तर मनसे पूर्णपणे हिंदुत्वाच्या मार्गावर राहणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. भगवा रंग आणि शिवराजमुद्रा हे या गोष्टीचे संकेत देत आहेत.
मनसेच्या जुन्या झेंड्यात मध्यभागी भगवा तर वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूस हिरवा रंग आहे. मात्र मनसेच्या नवीन झेंड्यात भगवा रंग असण्याची शक्यता आहे. तसेच मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये मनेसचे निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन देखील नसेल.
हेदेखील वाचा-मनसे आपला झेंडा बदलणार? काय असणार राज ठाकरे यांची पुढील रणनीती? वाचा सविस्तर
येत्या 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख हिंदुहृद्यसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे या नव्या झेंड्याचे अनावर करणार असल्याचे बोलले जात आहे.
9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाची स्थापना केली. पक्षाचा सुरुवातीचा प्रवास जसा आक्रमक होता तसाच तो बदलत्या काळासोबत मावळात गेला. 2009 साली राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यांचे 13 आमदार निवडून आले. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मात्र पक्षाला एकाच जागी समाधान मानावे लागले. त्यामुळे राज ठाकरे आता पक्षाची रणनीती लवकरच बदलणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत रंगत आहे.