Ceropegia Shivarayina: विशाळगड वर नव्या प्रजातीच्या वनस्पतीला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देत अनोखी आदरांजली अर्पण!

छत्रपती शिवाजी महाराज

शिव छत्रपती महाराजांचं वैभव म्हणजे किल्ले आहेत. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमधील एक मह्त्त्वाचा किल्ला म्हणजे विशाळगड (Vishalgad) आहे. या गडावर एका नव्या प्रजातीच्या वनस्पतीचा शोध लागला आहे. शिवरायांप्रति कृतज्ञता अर्पण करण्यासाठी आता या नव्या प्रजातीला 'शिवरायीना' (Shivarayina) असं नाव देण्यात आलं आहे. ही वनस्पती कंदील पुष्प वर्गातील आहे.

ABP Majha च्या रिपोर्टनुसार, न्यू कॉलेज, कोल्हापूर येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे अक्षय जंगम, रतन मोरे आणि डॉ. निलेश पवार, चांदवड नाशिक येथील डॉ. शरद कांबळे तसेच शिवाजी विद्यापीठामधील प्रा. डॉ. एस. आर. यादव यांनी विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील वनस्पतीचा शोध लावला आहे. या संदर्भातील शोधनिबंध न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला आहे. अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या नावाने प्रथमच एका वनस्पतीच्या प्रजातीला नाव ठेवण्यात आले आहे. शिवनेरी गडावर पहिल्यांदा सापडलेल्या Frerea या दुर्मिळ वनस्पतीचं नामकरण लवकरच 'शिव सुमन' .

ऑगस्ट 2023 मध्ये विशाळगडावर कंदीलपुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती समोर आली होती. भारतामधील कंदीलपुष्प वर्गाचे तज्ञ असणारे डॉ. शरद कांबळे यांनी या वनस्पतीची सखोल पाहणी केली होती. यावेळी ही नवीन प्रजाती असण्याची शक्यता व्यक्त केली होती. नंतर वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. एस. आर. यादव यांनी या सेरोपेजिया वर्गाला भारतभर एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. ज्यांनी आत्तापर्यंत या वर्गातील 6 नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत, त्यांनी अंतिम निरीक्षणानंतर सदर वनस्पती ही नवीन प्रजाती म्हणून घोषित होऊ शकते, यावर शिक्कामोर्तब केले आहे.

दरम्यान नवीन प्रजाती विशाळगडावर मर्यादित संख्येत असली तरी आजूबाजूच्या डोंगररांगांमध्ये सुद्धा ही प्रजाती आढळू शकते अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ सह्याद्रीच्या रांगांमध्ये रोवली होती. स्वराज्य रक्षणात गडांचे त्याचबरोबर सभोवतालच्या जंगलांचे महत्व त्यांना ठाऊक होते. सुमारे तीन शतकं गुलामगिरीत असलेल्या महाराष्ट्रात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कंदीलपुष्प कुळातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला शिवरायांचे नाव देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त संधी आम्हाला मिळाली असे संशोधकांनी म्हटलं आहे. या कामासाठी न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, आणि संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांनीही मदत केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.