Shivajirao Adhalrao Patil: शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित, शिरुरमधून निवडणूक लढवणार

26 तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार असून त्यावेळी आढळराव पाटील पक्षप्रवेश करतील अशी माहिती खासदार सुनिल तटकरेंनी दिली आहे.

Shivajirao Adhalarao Patil (Photo Credit - Facebook)

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश आता निश्चित झाला आहे. 26 मार्च रोजी आढळराव पाटलांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळं आता शिरुरमध्ये पुन्हा एकदा यापूर्वीचे प्रतिस्पर्धी आढळराव आणि कोल्हे यांच्यातच थेट लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी आढळरावांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आहे.  पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील ज्यांचा पक्ष प्रवेश लवकरच होणार आहे ते शिवाजीराव आढळराव पाटील आणि काही पदाधिकाऱ्यांची आणि आमची बैठक झाल्याचे  खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.  26 तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार असून त्यावेळी आढळराव पाटील पक्षप्रवेश करतील असे त्यांनी सांगितले. (हेही वाचा - Lok Sabha Elections 2024: अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या 'धनुष्यबण' तर स्वरा भास्कर आणि राज बब्बर काँग्रेसच्या 'पंजा'वर लढणार निवणूक? राजकीय वर्तुळात चर्चा)

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनातून राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्यानं त्यावर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, "आपदधर्म म्हणून त्यांनी काही निर्णय घेतला असेल तरीसुद्ध शिंदे, अजितदादा आणि फडणवीस यांनी मिळून याबाबत निर्णय घेतला असेल. आढळराव पाटलांनी खूप चांगलं काम मतदारसंघात केलेलं आहे. त्यामुळं ते पुढच्या काळात निवडून येतील, पण त्यामुळं आजच्या घडीला गैरसमज पसरता कामा नये"

दरम्यान आढळराव पाटलांनी आपला शिरुरमधला विजय निश्चित असल्याचे वक्तव्य केले आहे.  पाटील म्हणाले, जी आकडेवारी आहे त्यात माझ्याकडं काहीही नसताना मी पहिली निवडणूक ३० हजार मतांनी जिंकलो, दुसरी १ लाख ८० हजारांनी तर तिसरी निवडणूक ३ लाख ३० हजारांनी जिंकलो होतो. त्यानंतर आता चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे.