Shiv Swarajya Din 2021: शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरातूनच साजरा करण्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं आवाहन

महाराष्ट्र राज्य सरकार यंदाच्या वर्षीपासून शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करणार आहे.

Sambhaji Raje (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रामध्ये 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शिवराय छत्रपती शिवाजी महाराज झाले होते. त्यामुळे शिवप्रेमी मोठ्या संख्येने शिवनेरी वर जमा होऊन हा दिवस साजरा करतात. पण यंदाच्या वर्षी देखील कोरोनाचा धोका पाहता हा उत्सव प्रातिनिधिक स्वरूपात साजरा केला जाईल असे सांगण्यात आले आहे. खासदार संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati)  यांनी ट्वीट करत काल महाराष्ट्रातील जनतेला आणि शिवप्रेमींना केलेल्या आवाहनामध्ये त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता शिवराज्याभिषेक सोहळा घरातूनच साजरा करण्याचं आवाहन केले आहे. Shiv Swarajya Din 2021: शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचं सेलिब्रेशन यंदापासून राज्यभर ग्रामपंचायतींसमोर स्वराज्य गुढी उभारत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण प्रकरणी राज्याच्या विविध जिल्ह्यांना भेट देत असताना संभाजीराजेंनी नाशिककरांना मिळेल त्या वाहनाने मोठ्या संख्येने शिवनेरीवर या असं आवाहन केले होते पण आता त्यांनी परिस्थितीचं भान जपत ,'स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत. छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.' असं भावनिक आवाहन केले आहे.

संभाजीराजे ट्वीट

महाराष्ट्र राज्य सरकार यंदाच्या वर्षीपासून शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करणार आहे. याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर ग्रामपंचायतींसमोर स्वराज्य गुढी उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.