Shiv Sena Update: एकनाथ शिंदे गटात धुसफूस? 22 आमदार, 9 खासदार बाहेर पडण्याची शक्यता, उद्धव ठाकरे यांच्या विश्वासूच्या दाव्याने खळबळ
विनायक राऊत हे शिवसेना (UBT) गटाचे प्रमुख नेते आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीयसुद्धा आहेत. त्यामुळे राऊत यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान आले आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत गेलेल्या आमदार, खासदारांमध्ये मोठी नाराजी आहे. एकनाथ शिंदे हे स्वत: स्थिरस्थावर झाले. मात्र, त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार खासदारांची कामे होत नाहीत. त्यांना पुरेसा निधी मिळत नाही. त्यात त्यांना तुच्छतेची वागणूकही मिळत आहे. परिणामी हे आमदार, खासादर त्रस्त आहेत. लवकरच ते शिंदे गटातून बाहेर पडतील. शिंदे गटातील जळपास 22 आमदार आणि 13 खासदार हे बाहेर पडण्याच्या विचारात, असल्याचा दावा खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. विनायक राऊत हे शिवसेना (UBT) गटाचे प्रमुख नेते आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीयसुद्धा आहेत. त्यामुळे राऊत यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान आले आहे.
विनायक राऊत यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारमधील महत्त्वाचे मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना 15 दिवसांपूर्वी निरोप पाठविला होता. आमची इकडे गळचेपी होत आहे. मंत्री तानाजी सावंत आणि गजानन कीर्तिकर यांनीही आपल्या असंतोषाला जाहीरपणे वाट मोकळी करु दिली होती. तानाजी सावंत यांनी तर म्हटले होते की, निधी मिळत नसल्याने आपली आवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्याची आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदार खासदारांची मोठी कोंडी झाल्याचा राऊत यांनी दावा केला आहे. (हेही वाचा, Gajanan Kirtikar On BJP: एकनाथ शिंदे गटातील खासदाराचा भाजपवर सापत्न वागणूकीचा आरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान)
दरम्यान, नव्या संसद इमारतीच्या कार्यक्रमावरुन राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. संसदेची नवी इमारत भव्यदिव्य आहेच. त्याबद्दल कोणाचेच दुमत नाही. शिवाय ती इमारत विक्रमी काळातही उभारली गेली. मात्र, संसदेच्या लोकार्पण कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना निमंत्रण दिले गेले नाही. त्यांना जर निमंत्रण देण्यात आले असते तर काय झाले असते. इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना निमंत्रण न देणे म्हणजे लोकशाहीची अवहेलना असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.