Shiv Sena Symbol Row: शिंदे गटाकडून 'मशाली' ला टक्कर देण्यासाठी सूर्य, पिंपळाचं झाड, ढाल-तलवार 3 नव्या चिन्हांचा पर्याय सादर

आता यापैकी कोणते चिन्ह त्यांना मिळणार याची उत्तर पुढील काही तासांत मिळण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आता शिंदे-ठाकरे गट पहिल्यांदाच अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीमध्ये (Andheri East By Poll) एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या निवडणूकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने काल ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. पण शिंदे गटाने सूचवलेले तिन्ही चिन्हांचे पर्याय फेटाळत त्यांना नवे पर्याय सूचवण्यास सांगितले होते. त्यानुसार आता शिंदे गटाने सूर्य, पिंपळाचं झाड, ढाल-तलवार हे तीन पर्याय निवडणूक आयोगाला कळवले आहेत. आता यापैकी कोणते चिन्ह त्यांना मिळणार याची उत्तर पुढील काही तासांत मिळण्याची शक्यता आहे. नक्की वाचा: Shiv Sena Name & Symbol: उद्धव ठाकरे यांना 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' नावासह 'मशाल' चिन्ह; एकनाथ शिंदे गटाची तिन्ही चिन्हे फेटाळली, 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मात्र मिळाले.

दरम्यान शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीकरिता आयोगाने 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' ही निशाणी गोठवली आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांना नव्या नाव आणि चिन्हासह निवडणूकीला सामोरं जावं लागणार आहे. यापूर्वी शिंदे गटाकडून दिलेले उगवता सूर्य आणि त्रिशूळ हे दोन पर्याय ठाकरे गटाच्या पर्यायामध्येही असल्याने ते बाद झाले तर गदा ही धार्मिक भावनेशी आणि शस्त्राशी निगडीत असल्याने बाद करण्यात आली.

रमेश लटके या शिवसेनेच्या आमदाराचं निधन झाल्यानंतर रिक्त जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणूकीकरिता कॉंग्रेस पक्षानेही त्यांना आपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढणार आहे.  तर 'बाळासाहेबांची शिवसेना' भाजपाच्या सोबतीने ही निवडणूक लढणार आहे. 3 नोव्हेंबरला त्यासाठी मतदान होईल 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल.