जोशी असलो तरी ज्योतीषी नाही, महायुती 200 जागा पार करणे कठीण: मनोहर जोशी

त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार हे निश्चीत सांगता येणं कठीण आहे.' दरम्यान, महायुतीला 200 पेक्षा अधिक जागा मिळवणं कठीण असल्याचेही जोशी यांनी म्हटले आहे.

Manohar Joshi | (Photo Credit: File Photo)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाहीचा उत्सव पार पडत आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी लोक मतदान करत आहेत. या उत्सवात सहभागी होत राज्यभरातील राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ( Shiv Sena) ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनीही मुंबई येथे मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, मतदान करुन मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर जोशी यांनी आपल्या खास शैलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांनी जोशी यांना विचारले की, या वेळी कोणत्या पक्षाला किती जागा येऊ शकतील? आपला अंदाज काय? यावर जोशी मिश्कीलपणे म्हणाले की, 'मी जोशी असलो तरी ज्योतीषी नाही. त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार हे निश्चीत सांगता येणं कठीण आहे.' दरम्यान, महायुतीला 200 पेक्षा अधिक जागा मिळवणं कठीण असल्याचेही जोशी यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना जोशी यांनी सांगितले की, माझ्या राजकीय जीवनात मी अनेक निवडणुका पाहिले आहेत. मतदान हे खासगी असतं आणि खासगीच राहतं. त्यामुळे मतदाराच्या मनात काय आहे हे कोणालाच कळत नाही. कोणत्याही निवडणुकीबाबत कधीच कोणता अंदाज बांधता येत नाही. जर कोणी अंदाज व्यक्त केला असेल आणि तो खरा ठरला असेल तर, तो एक योगायोग असेल. पण, आजवर असा कोणाचाच अंदाज अधिक वेळा खरा ठरला नाही, असेही जोशी म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या वयातही झंजावती प्रचार करत आहेत, याकडे आपण कसे पाहता?, असे विचारले असता, 'शरद पवार हे माझ्यापेक्षा लहान आहेत', असे जोशी म्हणाले. दरम्यान, पुढे बोलताना जोशी यांनी सांगितले की, 'शरद पवार हे प्रचार करत आहेत. ही चांगली बाब आहे. पण, त्यांच्या सर्वच गोष्टींचे मी समर्थन करणार नाही. माझी बांधीलकी शिवसेनेशी आहे', असेही जोशी या वेळी म्हणाले. (हेही वाचा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीवर 30 हजार कोटींचा सट्टा, भाजप नाही तर राष्ट्रवादी पक्षाला सर्वाधिक भाव)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप हे युती करुन लढत आहेत. या निवडणुकीत एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढतो आहे. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी 124 जागा लढवत आहे. उर्वरीत जागा दोन्ही पक्षांनी समाजवादी पक्ष, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष अशा मित्रपक्षांना सोडल्या आहेत.