Sanjay Raut On Governor: 'दुडुदुडु धावताना दम लागून पडाल कुठेतरी', शिवसेना खासदार संजय राऊत यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला

त्या राज्यांमध्ये भाजप राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करु इच्छिते. तुम्ही पाहा दिल्लीमध्ये सध्या काय सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये आणि महाराष्ट्रामध्येही असेच सुरु आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल दुडुदुडू धावत आहेत. धावू द्यात. दम लागू पडाल एकेदिवशी, असा टोला संजय राऊत यांनी राज्यपालांना लगावला.

Sanjay Raut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sen) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते दिल्ली येथे बोलत होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे हिंगोली, नांदेड आणि परभणीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते एका वसतीगृहाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच, संबंधीत जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशीही बैठक घेऊन आढावा घेणार आहेत. राज्यपालांच्या या कृतीवर राज्य सरकारने आगोदरच नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनीही राज्यपालांच्या भूमिकेवरुन आज टीका केली आहे.

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ज्या राज्यांमध्ये भाजपची सरकारं नाहीत. त्या राज्यांमध्ये भाजप राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करु इच्छिते. तुम्ही पाहा दिल्लीमध्ये सध्या काय सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये आणि महाराष्ट्रामध्येही असेच सुरु आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल दुडुदुडू धावत आहेत. धावू द्यात. दम लागू पडाल एकेदिवशी, असा टोला संजय राऊत यांनी राज्यपालांना लगावला. (हेही वाचा, Sanjay Raut On Governor: राज्यपालांनी राजकीय कारणांनी सरकारची अडवणूक करु नये- संजय राऊत)

दरम्यान, संजय राऊत यांनी कालही राज्यपालांवर हल्लाबोल केला होता. राज्यपालांबाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटले होते की, कोणत्याही राज्यातील राजभवन हे राज्य आणि राज्य सरकारला मदत करण्यासाठी असते. सरकारचे पाय खेचण्यासाठी नव्हे. तसे केले तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून तुम्ही पडण्याचीच शक्यता अधिक असते, असा टोला लगावत संजय राऊत यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला. शिवाय राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करणे म्हणजे तो एक राजकीय दबावाचाच प्रयत्न असतो.

राज्यपाल या पदाला आणि त्या पदावरील व्यक्तीला काम करण्यासाठी घटनात्मक मर्यादा असतात. त्या पाळायच्या असतात. महाराष्ट्राच्या राज्यपालांनीही त्या पाळाव्यात. हवे तर भाजपशासीत राज्यांमधील राज्यपाल कशा पद्धतीने काम करतात हेही पाहावे, असा सल्ला देत संजय राऊत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना टोला लगावला होता.