Maharashtra: राज्यपालांनी राजकारणातील प्यादे होऊ नये; विधान परिषदेच्या जागांवरून संजय राऊत यांचा टोला
राज्यपाल हे न्यायालयाला बांधील नाहीत, परंतु घटनात्मक जबाबदाराऱ्यांचे पालन करणे त्यांचे कर्तव्य आहे, ते त्यांनी विनाविलंब पार पाडावे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत (Maharashtra Legislative Council) उच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्वाची टिप्पणी दिली. राज्यपाल हे न्यायालयाला बांधील नाहीत, परंतु घटनात्मक जबाबदाराऱ्यांचे पालन करणे त्यांचे कर्तव्य आहे, ते त्यांनी विनाविलंब पार पाडावे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याचदरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी राजकारणातील प्यादे होऊ नये, असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी नुकताच मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यपालांकडून घटनात्मक पेचप्रसंगह निर्माण होऊ नये, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यांनी स्वत:ला राजकीय प्यादे म्हणून वापरू देऊ नये. ते पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते किंवा संघाचे प्रचारक असू शकतात. त्यावर आमची काही भूमिका किंवा आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु, घटनेनुसार राज्यांच्या अधिकारांवर, कॅबिनेटच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असतील तर हे या देशाच्या संघराज्यावर हल्ला आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. हे देखील वाचा- उच्च न्यायालयाप्रमाणे राज्यपाल देखील संविधानाच्या लक्ष्मण रेषेचं पालन करतील- रोहित पवार
दरम्यान, विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रस्ताव राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेऊ शकत नाहीत. राज्यघटनेनुसार राज्यपालांनी विशिष्ट कालावधीत निर्णय घेणे बंधनकारक आहे. आठ महिने उलटून गेले असूनही 12 आमदारांच्या नियुक्ती झाल्या नाहीत. विधान परिषदेच्या जागा अनिश्चिात काळासाठी रिक्त ठेवल्या जाऊ शकत नाहीत. राज्यपालांनी फार विलंब न करता त्यांचे घटनात्मक कर्तव्य पार पाडले तर ते योग्य ठरेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.