शिवसेना खासदार अनिल देसाई यांची बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक; दूर होणार काँग्रेसची नाराजी?
मात्र, काही कारणांनी ही भेट होऊ न शकल्याने अनिल देसाई या नेत्यांच्या भेटीला गेल्याचे समजते.
शिवसेना (Shiv Sena) खासदार अनिल देसाई (Anil Desai) हे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि काँग्रेस (Congress) नेत्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. काँग्रेस नेते आणि काँग्रेस नेते यांच्या प्रदीर्घ काळ बैठक सुरु आहे. या बैठकीतून काय तोडगा निघणार. काँग्रेसची नाराजी, रुसवा दुर होणार का? याबाबत उत्सुकता आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये तुलनेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच अधिक जोर आहे. काँग्रेस पक्षाला निर्णय प्रक्रियेतून डावलले जात असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून वारंवार येत आहे. त्यातच शिवसेना मुखपत्र दैनिक सामनातून काँग्रेसच्या नाराजीबाबत टोलेबाजी करण्यात आल्याने काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटू इच्छित होते. मात्र, काही कारणांनी ही भेट होऊ न शकल्याने अनिल देसाई या नेत्यांच्या भेटीला गेल्याचे समजते.
दरम्यान, 'खाट का कुरकुरतेय' या मथळ्याखाली दै. सामनामध्ये लिहिलेल्या संपादकीयात म्हटले होते की, हे सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच शब्द अंतिम राहील हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्य पाळले आहे. ते मुख्यमंत्र्यांना अधुनमधून भेटत असतात. त्यांचा अनुभव मोठा. त्यानुसार राज्यासंदर्भात ते काही सूचना करतात. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरने सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे, सल्लाही सामना संपादकीयातून देण्यात आला होता.
सामना संपादकीयावर प्रतिक्रिया देताना सामानातील अग्रलेख अपूऱ्या माहितीवर आधारलेला आहे. जरा पूर्ण माहिती घेऊन हा लेख लिहिला असता तर बरे झाले असते. हरकत नाही. संपूर्ण माहिती घेतल्यावर पुन्हा एक चांगला अग्रलेख येईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. तसेच आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत आहे. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की समाधानी होतील, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला होता. (हेही वाचा, काँग्रेसची जुनी 'खाट का कुरकुरतेय?', शिवसेना मुखपत्र सामना संपादकियातून टोलेबाजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला)
दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सोबत घेतले जात नाही. राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा एक गट तिन्ही पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेसच्या या नाराजीवर देसाई यांच्यासोबतच्या बैठकीत तोडगा निघतो का याबाबत उत्सुकता आहे.