Shiv Sena: शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर? एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या संख्येने आमदार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांच्याकडून डॅमेज कंट्रोल सुरु
छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसनेला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हाताय असताना शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीनंतर पुन्हा एकदा शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर (Shiv Sena Likely Split) आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसनेला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे हे सूरतला रवाना झाल्याचे वृत्त आहे. त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. त्यामुळे सध्या त्यांचे काय सुरु आहे याबाबत कोणतीच माहिती स्पष्टपणे पुढे येत नाही. धक्कादायक वृत्त म्हणजे एकनाथ शिंदे हे मोठ्या प्रमाणावर शिवसेना आमदारांना सोबत घेऊन सुरतला पोहोचल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut), मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचयाकडून डॅमेज कंट्रोल सुरु झाले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या संख्येचा आकडा सातत्याने वाढतो आहे. सुरुवातील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या 11 असल्याचे पुढे येत होते. मात्र, प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ही संख्या आता 25 वर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे यात शिवसेनेच्या काही मंत्र्यांचाही समावेश असल्याचे समजते आहे. त्यामुळे शिवसेना खरोखरच फुटीच्या उंबरठ्यावर आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले सर्वाधिक आमदार हे मराठवाड्यातील आहेत. (हेही वाचा, Maha Vikas Aghadi: मविआ सरकार अल्पमतात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांची कसोटी; काय सांगते आकडेवारी?)
शिवसेनेचे नॉट रिचेबल आमदार/मंत्री
- राज्यमंत्री अब्दुल सत्तार- सिल्लोड
- महेश शिंदे- सातारा
- शहाजी पाटील- सांगोला
- ज्ञानराज चौगुले- उमरगा
- तानाजी सावंत- तानाजी सावंत
- संजय रायमूलकर- बुलढाणा
- संजय गायकवाड- मेहकर
- नितीन देशमुख- बाळापूर
- संजय शिरसाट- औरंगाबाद
- उदयसिंग राजपूत- कन्नड
- प्रा. रमेश बोरनारे- वैजापूर
- प्रकाश आबिटकर- भूदरगड
- भरत गोगावले- महाड
विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटींग झाले. परिणामी मविआ उमेदवाराचा पराभव झाला. या धक्क्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (21 जून) दुपारी 12 वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. सर्व आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, शिवसनील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले एकनाथ शिंदे हेच आता नॉट रिचेबल असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.