राम मंदिर: ... तर मोदी सरकार खाली खेचून दाखवा; उद्धव ठाकरेंचा 'आरएसएस'ला टोला
पण, हे सरकार सत्तेत आल्यावर संघाच्या कार्यक्रमालाच फाटा मिळाला. राम मंदिर, कलम ३७०, समान नागरी कायदा यांसारखे मुळ अजेंड्यावरचे विषय बाजूला पडले आहेत - उद्धव ठाकरे
हिंदुत्ववादी विचारांचे बहुमताचे सरकार सत्तेत असतानाही राम मंदिराचा मुद्दा अडगळीत पडला. मात्र, शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा लावून धरल्यानंतर अनेकांना खडबडून जाग आली. त्यामुळे आता या मंडळींना पुन्हा एकदा राम मंदिरासाठी आंदोलन उभारण्याची गरज वाटू लागली आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) केला आहे. तसेच, मजबूत संख्याबळ असलेलं सरकार सत्तेत असताना राम मंदिरासाठी आंदोलनाची गरज वाटत आहे, तर हे सरकार तुम्ही खाली का नाही खेचत, असा रोखडा सवालही उद्धव ठाकरे यांनी आरएसएससमोर उभा केला आहे.
राम मंदिराच्या मुद्द्यावर गरज पडल्यास पुन्हा एकदा आंदोलन उभारु असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरकारला आजच (शुक्रवार, २ नोव्हेंबर) दिला होता. या इशाऱ्यावरुन उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टोला लगावला आहे. शिवसेनेचे आमदार, संपर्क नेते, जिल्हा पदाधिकारी यांची शिवसेना भवनात बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्यातील आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. या वेळी बोलताना २५ नोव्हेंबरच्या आयोजित अयोध्या दौऱ्याबाबतची माहिती कार्यकर्त्यांना दिली असल्याचे ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. (हेही वाचा, राम मंदिर: गरज पडल्यास पुन्हा आंदोलन उभारु; न्यायालयानेही लोकभावनेचा आदर करावा:आरएसएस)
दरम्यान, या वेळी ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, केंद्रातील सरकार सत्तेत येण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परिश्रम आहेत. पण, हे सरकार सत्तेत आल्यावर संघाच्या कार्यक्रमालाच फाटा मिळाला. राम मंदिर, कलम ३७०, समान नागरी कायदा यांसारखे मुळ अजेंड्यावरचे विषय बाजूला पडले आहेत. शिवसेनेने राम मंदिराबबत नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. मी स्वत: येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येत जात आहे. शिवसेनेने भूमिका जाहीर केल्यानंतर अनकांची धवपळ उडाली आहे. म्हणूनच राम मंदिर उभा राहिले नाही तर, पुन्हा आंदोलन उभारावे असे संघाला वाटते आहे. पण, मंदिर उभा राहात नसेल तर, आपल्याच परिश्रमातून बहुमताने सत्तेवर आलेले सरकार आपण खाली का खेचत नाही, असा थेट सवालही उद्धव ठाकरे यांनी या वेळी विचारला.