Gulabrao Patil Criticizes Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्या यांना शॉक दिल्याशिवाय त्यांची ही बडबड थांबणार नाही- गुलाबराव पाटील

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Gulabrao Patil Criticizes Kirit Somaiya (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी 345 कोटी बिल्डरला गिफ्ट दिले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांची बेताल बडबड थांबणार नाही, असे गुलाबराव पाटील मराठी वृत्तवाहिनी टीव्ही9शी बोलताना म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या हे बेताल बडबड करत असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तसेच त्यांना शॉक दिल्याशिवाय त्यांची ही बडबड थांबणार नाही. त्यांना ठाण्यातील रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची गरज आहे, असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. किरीट सोमय्या हे ठाकरे कुटुंबियांच्या पायाजवळ बसून खासदार झाले आहेत आणि आज त्यांच्यावरच टीका करत आहेत. हा माणूस अत्यंत कृतघ्न आहे अशीही टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. हे देखील वाचा- Kirit Somaiya On CM Uddhav Thackeray: किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिल्डरला 345 कोटी रुपये गिफ्ट दिले'

किरीट सोमय्या काय म्हणाले?

“ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड लाटण्यात गुंतलेले सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर, त्यांनी स्पष्ट ऐकावे. जी जमीन 2 कोटी 55 लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती 900 कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील 354 कोटी आधीच दिले आहेत,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

कथित जमीन व्यवहार प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून देणारे भाजप नेते किरीट सोमय्या आता शिवसेना नेत्यांच्या रडारवर आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत, राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.