Shiv Sena Dasara Melava 2022: शिवसेना दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणेच एकनाथ शिंदे गटाकडूनही बीएमसीकडे अर्ज
पहिला अर्ज आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा तर दुसरा आहे शिवसेना बंडखोर असलेल्या एकनाथ शिंदे गटाचा त्यामुळे एकाच मेळाव्यासाठी दोन दोन अर्ज आल्याने मुंबई महापालिका कोणाच्या अर्जाला प्राधान्याने परवानगी देणार याबाबत उत्सुकता आहे.
शिवसेना आणि शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे होणारा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) हे पाठिमागील कैक वर्षांचे समीकरण. कोरोनासारख्या अपवादानेच त्यात खंड पडला. यंदाही शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शिवसेना दसरा (Dasara 2022) मेळाव्याबद्दल उत्सुकता आहे. दरम्यान, यंदा या मेळाव्याबद्दल दुहेरी उत्सुकता आहे. त्याचे कारण म्हणजे शिवाजी पार्क अर्थातच शिवसेनेच्या भाषेत शिवतीर्थावरच्या मेळाव्यासाठी इतिहासात प्रथमच दोन अर्ज महापालिकेला प्राप्त झाले आहेत. पहिला अर्ज आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा तर दुसरा आहे शिवसेना बंडखोर असलेल्या एकनाथ शिंदे गटाचा (Eknath Shinde). त्यामुळे एकाच मेळाव्यासाठी दोन दोन अर्ज आल्याने मुंबई महापालिका (BMC) कोणाच्या अर्जाला प्राधान्याने परवानगी देणार याबाबत उत्सुकता आहे.
एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत बंड करुन वेगळी चूल थाटली. त्यामुळे नेमकी शिवसेना कोणाची हा वाद कोर्टात आणि निवडणूक आयोगाच्या दारातही पोहोचला. या वादावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे शिवसेना कोणाची या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीच आहे. तथापी दसरा मेळाव्याची परवानगी मागण्यासाठी परस्परांनी महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे अर्ज केला आहे. या अर्जामुळे मुंबई महापालिकेसमोर एक वेगळाच पेच निर्माण झाला आहे. या पेचावर महापालिका काय तोडगा काढते याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Aaditya Thackeray: गणपती बाप्पांच्या दर्शनावेळी पत्रकारांकडून राजकीय प्रश्न, आदित्य ठाकरे यांचे 'स्मार्ट' उत्तर)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसना पक्ष स्थापन केला. तेव्हापासून कोरोना काळ वगळता आजपर्यंत दरवर्षी शिवसेना दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पार पडतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ही परंपरा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे पुढे चालवत आहेत. यंदाही येत्या 5 ऑक्टोबर रोजी शिवतीर्थावर शिवसेना दसरा मेळावा पार पडणार आहे. परंत, त्यासाठी आवश्यक परवानगीसाठी दोन पत्रे पाठवूनही महापालिकेने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी आहे. शिवसेना दसरा मेळाव्याचे वैशिष्ट्य असे की, या मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक हजेरी लावत असतात.
मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक कारभार करत आहे. त्यामुळे पालिकेवर सद्यास्थितीत तरी राज्य सरकारचा अप्रत्यक्ष अंमल आहे. त्यातच एकनाथ शिंदे गटाकडूनही दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळेच पालिकेने अर्जाला मान्यता देण्याचा निर्णय काहीसा प्रलंबित ठेवला आहे, अशी चर्चा आहे. दरम्यान, महापालिकेच्या या भूमिकेवरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काहीशी टीका केली आहे.