Shiv Sena Dasara Melava 2020: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शाब्दिक फटकेबाजी; BJP वर कडाडून टीका, कंगना रनौत, सुशांतसिंह राजपूत, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाबाबत केले भाष्य

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर यंदा अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा होत आहे. अशात आजच्या दिवसाचे औचित्य साधून शिवसेनाचा दसरा मेळावा (Shiv Sena Dussehra Rally 2020) पार पडला.

CM Uddhav Thackeray | (Photo Credit: ANI)

आज देशभरामध्ये नवरात्रीचा शेवटचा दिवस विजयादशमी दसरा (Dussehra 2020) साजरा केला जात आहे. कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर यंदा अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा होत आहे. अशात आजच्या दिवसाचे औचित्य साधून शिवसेनाचा दसरा मेळावा (Shiv Sena Dussehra Rally 2020) पार पडला. वीर सावरकर सभागृहामध्ये अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी मंचावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, दिवाकर रावते, एकनाथ शिंदें, सुभाष देसाई असे नेते उपस्थित होते. संजय राऊत यांच्या भाषणापासून या मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी ते म्हणाले, ‘दसरा म्हणजे, वाईटावर चांगल्याचा विजय आहे. मागच्या वर्षी शिवसेनेच्या विजयाला सुरुवात झाली होती. यापुढे शिवसेनेच्या भविष्यामध्ये सर्व काही ‘महा’च होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्य्यावर अनेकांनी टीका केली, चिखलफेक झाली मात्र तरीही अगदी जोमाने ते महाराष्ट्राचा गाडा पुढे घेऊन जात आहेत.’

ते पुढे म्हणाले, ‘हा जो आत्मविश्वास आला तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आला. त्यांच्या शिकवणुकीमुळे हे शक्य झाले. मात्र कोणी कितीही प्रयत्न केले, कितीही कारस्थाने केले तरी हे महाराष्ट्राचे सरकार ज्याला संपूर्ण देश ठाकरे सरकार म्हणून ओळखते ते त्याचे 5 वर्षे नक्कीच पूर्ण करेल.’ शेवटी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकृतीबद्दल प्रार्थना करून व सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन आपले भाषण आटोपते घेतले.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आज महाविजयादशमी निमित्त सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. मी ज्या वेळी मुख्यमंत्री पदावर बसलो तेव्हापासून सर्वजण हे सरकार पडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हिम्मत असेल तर सरकार पडून दाखवा. आम्ही गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे नाहीत. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने हा दसरा मेळावा पार पडत आहे. दसरा मेळावा हा काही टारगेट करण्याचा दिवस नाही. मात्र काही जणांना लस, इंजेक्शन देण्याची गरज असते. काही बेडके व त्याची दोन पोरे आहेत जे सध्या या पक्षामधून त्या पक्षामध्ये प्रवेश करीत असतात. आता आज त्यांनी आज वाघ पाहिला आहे. बेडूक आवाज काढतोय मात्र तो कधीच वाघ होऊ शकणार नाही.'

पुढे ते म्हणाले, ‘ज्या महाराष्ट्राच्या मातीने औरंगजेब गाडला, अफजलखान गडाला त्याच मातीचे तेज अजूनही कायम आहे. राज्यात मंदिरे उघडली जात नाहीत म्हणून आमच्या हिंदुत्वाबाबत प्रश्न विचारले जात आहेत. मात्र ज्यावेळी बाबरी पाडली गेली त्यावेळी हेच प्रश्न विचारणारे लोक शेपूट आत घालून बिळामध्ये बसले होते. इथे गोहत्या हा कायदा आहे मात्र गोव्यात का नाही?

त्यानंतर त्यांनी आजच्या संघाच्या कार्यक्रमातील मोहन भागवत यांच्या वाक्याबद्दल त्यांच्यावर निशाणा साधला. मोहन भागवत यांनी हिंदुत्ववरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. भाजपने अनेक राज्यांमध्ये तोडफोडीचे राजकारण केले, मात्र त्याऐवजी त्यांनी थोडे लक्ष देशावरही द्यायला हवे. आम्हाला आमच्या जनतेला मदत करायची आहे मात्र आम्ही पैसे आणायचे कुठून? महाराष्ट्राच्या हक्काचे 28 हजार कोटी केंद्राकडे बाकी आहेत. आमच्या हक्काचा पैसा आम्हाला मिळत नाही. ही जीएसटीची पद्धत पूर्णपणे फसली आहे, त्यामुळे मी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करूया.’

‘भाजपने इतर राज्यांमध्ये जो डाव खेळला तसा प्रयत्न महाराष्ट्रामध्येही झाला. मात्र तो डाव आमच्यामुळे फसला. भाजपला हिंदुत्ववादी शिवसेना नको होती मात्र आता बिहारमध्ये संघमुक्त भारत असे म्हणणाऱ्या नितीश कुमार यांना भाजपने जवळ केले.'

पहा व्हिडिओ -

 

आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कंगना रनौतने मुंबई व महाराष्ट्रबाबत केलेल्या बदनामीवरही निशाणा साधला, ‘घरी काम मिळत नाही म्हणून इथे येता, इथे कष्ट केले असे दाखवता, इथे मीठ खाता आणि त्याच्याशी गद्दारी करता. महाराष्ट्राची बदनामी का करता? मुंबईची बदनामी करण्यासाठी इथले लोक गांजा पितात, चरस पितात, इथे शासन व्यवस्था नाही, हा प्रदेश पाक व्याप्त काश्मीर झाला आहे असे बोलले जात आहे. मात्र असे असले तर ते पंतप्रधानांचे अपयश आहे. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली, या प्रकरणामध्ये खरच काही असते तर ते मुंबई पोलिसांनी नक्कीच शोधून काढले असते. या बाबतही महाराष्ट्राची बदनामी झाली, आदित्य ठाकरे, महाराष्ट्र पोलीस यांच्याही बदनामी झाली. मात्र मी हे सहन करणार नाही. त्यामुळे मी सर्वांना सांगतो की हे लोक महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, तरी सर्वांनी सावध रहा.' (हेही वाचा: मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर करायचा आणि येथील मातीशी नमकहरामी करायची; मुख्यमंत्र्याचा कंगना रनौतवर शिवसेना दसरा मेळाव्यात निशाणा)

शेवटी ते म्हणाले, ‘इथे कळसूत्री भावल्यांचा खेळ होणार नाही. मर्द मावळ्यांचे सरकार येणार आहे, सध्या कोरोनाच्या संकटामध्ये देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे, अशात भाजपने तोडफोडीचे राजकारण न करता त्यांनी देशावर लक्ष केंद्रित करावे.’