दिल्ली हिंसाचार: 'देशाला गुदमरुन टाकणाऱ्या हिंसेच्या धुरात गृहमंत्री अमित शाह कुठेच दिसत नाहीत'

पण, ते दिसले नाहीत याचे आश्चर्य वाटते. विधानसभआ निवडणूकीत अमित शाह हे गृहमंत्री असताना पत्रके वाटत फिरत होते व प्रचार कार्यासाठी त्यांनी भरपूर वेळ काढला होता, पण संपूर्ण दिल्लीत हिंसक आगडोंब पेटला असताना हेच गृहमंत्री कुठे दिसले नाहीत, असा टोलाही अमित शाह यांना सामनातून लगावला आहे.

Amit Shah | Photo Credits: Twitter

'वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या गौरवासाठी जे राजकीय नौटंकी करीत आहे त्यांनी देशाच्या गौरवाचा विचार करावा', असा टोला भाजपला लगावतानाच 'राजधानीतला हिंसेचा दूर देशाला गुदमरुन टाकत आहे. त्या धुरात देशाचे गृहमंत्री कुठेच दिसत नाहीत' अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर करण्यात आली आहे. सावरकर गौरव प्रस्ताव आणि दिल्लीत उसळलेला हिंसाचार (Delhi Violence) या मुद्द्यावरुन शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामना ( Daily Saamana) संपादकीयातून ही टीका करण्यात आली आहे.

'दिल्ली जळत असताना, आक्रोश करीत असताना गृहमंत्री अमित शाह कुठे होते? काय करती होते? असे प्रश्न विचारले जात आहेत. दिल्लीच्या दंगलीत आतापर्यंत 38 बळी गेले आहेत सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. समजा, केंद्रात काँग्रेस अथवा अन्य आघाडीचे सरकार असते व विरोधी बाकांवर भारतीय जनता पक्षाचे महामंडळ असते तर दंगलीबद्दल गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत मोर्चे व 'घेराव'चे आयोजन केले गेले असते. राष्ट्रपती भवनावर धडक दिली असती. गृहमंत्री अपयशी ठरल्याचे खापर फोडून राजीनामा मागितला असता. पण आता तसे होणार नाही. कारण भाजप सत्तेत आहे आणि विरोधी पक्ष कमजोर आहे.' असा घणाघात दै. सामना संपादकीयातून करण्यात आला आहे.

केंद्र सरकार आणी दिल्ली पोलीस यांच्यावर टीका करताना सामनात म्हटले आहे की, 'देशाच्या राजधानीत 38 बळी गेले. त्यात पोलीसही आहेत व केंद्राचे अर्धे मंत्रिमंडळ त्यावेळी अहमदाबादेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना फक्त ''नमस्ते, नमस्ते साहेब'' असे करण्यासाठी गेले होते. केंद्रीय गृहमंत्री व त्यांचे सहकारी अहमदाबादेत होते तेव्हा गृहखात्याचे एक गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यंची हत्या दंगलीत झाली. तब्बल तीन दिवसांनंतर पंतप्रधान मोदी यांनी शांतता राखण्याचे अवाहन केले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे चौथ्या दिवशी त्यांच्या सहकाऱ्यांसह दिल्लीच्या रस्त्यांवर लोकांशी संवाद साधताना दिसले. त्याने काय होणार जे व्हायचे ते नुकसान आधीच होऊन गेले आहे, असा संतापही दै. सामना संपादकीयातून व्यक्त करण्यात आला आहे. (हेही वाचा, स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा 'संघ' परिवार कोठे होता? सावरकर मुद्द्यावरुन शिवसेनेचा रोखठोक सवाल)

देशाला मजबूत गृहमंत्री लाभले आहेत. पण, ते दिसले नाहीत याचे आश्चर्य वाटते. विधानसभआ निवडणूकीत अमित शाह हे गृहमंत्री असताना पत्रके वाटत फिरत होते व प्रचार कार्यासाठी त्यांनी भरपूर वेळ काढला होता, पण संपूर्ण दिल्लीत हिंसक आगडोंब पेटला असताना हेच गृहमंत्री कुठे दिसले नाहीत, असा टोलाही अमित शाह यांना सामनातून लगावला आहे.