'थोरातांची कमळा' गाजला मात्र 'विखे-पाटलांची कमळा' चित्रपट आला व पडला- शिवसेना
एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. निदान स्वत: फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरुन ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या बाटग्यांचे, असा टोलाही सामना संपादकीयातून लगावण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे 'ठाकरे सरकार' स्थीर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकट हाकले जात आहे. फार पूर्वी 'थोरातांची कमळा' (Thoratanchi Kamala) हा चित्रपट गाजला होता. आता 'विखे-पाटलांची कमळा' असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंटी 'टूर अँण्ड ट्रॅव्हल' कंपनी बंद पडली आहे. मात्र, त्याचया टुटटूर सुरु आहे. वैफल्य, दुसरे काय!, असे म्हणत शिवसेना मुखपत्र दै. सामना Daily Saamana) संपादकीयातून भाजप (BJP ) नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. दरम्यान, एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे, असा टोलाही सामना संपादकीयातून (Saamana Editorial) लगावण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच दै. सामना संपादकीयामध्ये 'खाट का कुरकुरतेय' या मथळ्याखाली एक अग्रलेख लिहीला होता. त्यावरुन काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. दरम्यान काँग्रेसला जुनी खाट म्हटल्याबद्दल भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला चिमटा काढत डिवचले होते. तसेच, शिवसेनेलाही टोले लगावले होते. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले होते की, 'एवढी वर्षे काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत.' राधाकृष्य विखे-पाटलांच्या याच विधानावरुन दै. सामनातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. (हेही वाचा, काँग्रेसची जुनी 'खाट का कुरकुरतेय?', शिवसेना मुखपत्र सामना संपादकियातून टोलेबाजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला)
'थोरांताची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर!' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात सामनामध्ये म्हटले आहे की, जगभरातील विनोदी साहित्यात विसराळूपणा हे विनोदाचे अंग बनले आहे. मराठी रंगमंच आणि पडद्यावरही 'विसराळू' पात्र खास आणून विनोद निर्माण केला जातो. अशा विसराळू पात्रांत आता नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे पाटील यांची भर पडली आहे. काचेच्या घरात राहणारांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नयेत हा साधा नियम विखे विसरले असतील तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलेच बरे. विखे अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते हा आता इतिहास झाला. वरचेवर पक्ष बदलण्याची कला त्यांना अवगत आहे व आपण आदीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे विजनवासात आहेत. लाचारी व बेईमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक अचारसिंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वैगेरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते.विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधिचएकनिष्ठ नसतात. विखे काँग्रेस पक्षात होते. त्यांचे आजचे वैभव व साम्राज्य ही काँग्रेसची दिलदारी आहे. आजचा तालेवारपणा ही काँग्रेसचीच देणगी आहे. नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या खाटेवर तेव त्यांचे घराणेच आतापर्यंत पाय लांब करुन बसले होते. पण एक दिवस विखे कुटुंबीय शिवसेनेत आले. राज्यात, केंद्रात मंत्रिपदे भोगली आणि पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊन सत्ताधारी झाले. काँग्रेसकडून सत्तापद भोगले व 2019 च्या निवडणुकीपूर्वी ते फडणवीसवासी झाले.
दरम्यान, राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात 'बाटगे' घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वत:ची प्रतिष्ठाच धुळीस मळवली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वत:ची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. निदान स्वत: फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरुन ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या बाटग्यांचे, असा टोलाही सामना संपादकीयातून लगावण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)