Balasaheb Thackeray Death Anniversary: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे: भूमिका आणि निर्माण झालेले वाद
केवळ 20% राजकारण आणि 80% समाजकारण असे स्वरुप असलेल्या या संघटनेचा बाज असलेल्या राजकीय पक्षाचे नेतृत्व बाळासाहेबांनी आयुष्यभर केले. हे नेतृत्व करताना बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray Death Anniversary) यांच्या दिलदारीसोबतच चर्चेत राहिले ती त्यांची अनेक वादग्रस्त विधाने आणि भूमिका.
'शि व से ना' या चार अक्षरांपासून तयार होणाऱ्या शिवसेना (Shiv Sena) या राजकीय पक्षाची स्थापना करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Late Balasaheb Thackeray) म्हणजे एक प्रचंड वादग्रस्त आणि तितकेच दिलदार व्यक्तिमत्व. 'मार्मिक' (Weekly Marmik) या मराठीतील एकमेव व्यंगचित्र साप्ताहिकात 'वाचा आणि थंड बसा', 'वाचा आणि पेटून उठा', 'उठ मराठ्या उठ' अशी एकापेक्षा एक बहारदार व्यंगचित्र मालिका प्रकाशित करुन त्यांनी मराठी मानसाला आणि मनाला साद घातली. त्यातूनच मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर 19 जून 1966 रोजी जन्माला आली शिवसेना. केवळ 20% राजकारण आणि 80% समाजकारण असे स्वरुप असलेल्या या संघटनेचा बाज असलेल्या राजकीय पक्षाचे नेतृत्व बाळासाहेबांनी आयुष्यभर केले. हे नेतृत्व करताना बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray Death Anniversary) यांच्या दिलदारीसोबतच चर्चेत राहिले ती त्यांची अनेक वादग्रस्त विधाने आणि भूमिका. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेत राहिलेला अशा या नेत्याची आज (17 नोव्हेंबर) पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या भूमिकांमुळे वेळोवेळी निर्मण झालेल्या वादाचा हा अल्पसा आढावा.
'बजाव पुंगी हटाव लुंगी'
शिवसेना या राजकीय पक्षाचे नेतृत्व करत असताना बाळासाहेब ठाकरे आणि वाद असे समीकरणही नकळत जोडले गेले. त्याची सुरुवात मराठी माणसाच्या न्याय्य हक्कापासून झाली. मोठा संघर्ष करुन मराठी माणसाने मिळवलेल्या मुंबईत नोकऱ्यांमध्ये, खसगी कंपन्या, व्यवसायांमध्ये परप्रांतीयांचे (दक्षिण भारतीय लोक) मोठे वर्चस्व असल्याची भावना त्यावेळी (आजही) मराठी माणसाच्या मनात होती (आहे). त्यालाच साद घालत 'बजाव पुंगी हटाव लुंगी' अशी भूमिका शिवसेनेने घेतली आणि सुरु झाला एक वादाचा प्रवास. त्या वेळी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड टीका झाली. पण बाळासाहेब जुमानले नाहीत. त्यांनी प्रदीर्घ काळ आपली भूमिका कायम ठेवली.
'शिवसेना विरुद्ध कम्युनिष्ट'
शिवसेना राजकीय पक्ष म्हणून बाळसे धरत होती. त्या काळात मुंबईमध्ये डाव्या पक्षांचा म्हणजेच कम्युनिष्टांचा मोठाच वरचष्मा होता. कामगार वर्गामध्ये डाव्यांची मोठी ताकद होती. त्यामुळे काँग्रेससारखे राजकीय पक्षही मुंबईत कम्युनिष्टांना टरकून असत. भाजप वगैरेंचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. अशा वेळी मुंबईमध्ये कम्युनिष्टांसमोर शिवसेनेने आव्हान उभे केले. त्या दरम्यानच कम्युनिष्ट नेते आणि आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाली. या हत्येमागे शिवसेना असल्याचा आरोप तेव्हा केला गेला. तेव्हाही शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली.
'गर्व से कहो हम हिंदू है'
बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणांतून प्रचंड आक्रमक असत. खरे तर त्यांच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये ते तितके आक्रमक नव्हते असे त्यांना भेटलेले अनेक मान्यवर सांगतात. अशाच एका आक्रमकतेमुळे त्यांचा मतदानाचा आणि निवडणुकीला उभा राहण्याचा अधिकार निवडणूक आयोगाने काढून घेतला होता. निमित्त ठरली 987 मध्ये विलेपार्ले पोटनिवडणूक. विलेपार्ले येथील काँग्रेस आमदार हंसराज भुग्रा यांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू तर काँग्रेसकडून प्रभाकर कुंटे रिंगणात होते. या निवडणुकीत बाळासाहेबांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हा नारा दिला. या निवडणुकीत शिवसेना उमेदवार निवडून आला. परंतू, निवडणुकीत हिंदुत्त्वाचा वापर केल्याचा ठपका ठेवत बाळासाहेब ठाकरे यांचा मतदान आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार काढून घेण्यात आला. प्रदीर्घ काळ चाललेल्या या खटल्याचा निकाल 1999 मध्ये लागला. तेव्हापासून सुमारे पुढची सहा वर्षे म्हणजेच 1999 ते 2005 या काळात बाळासाहेबांना मतदान करता आले नाही.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वाद हे एक समिकरणच होते. वर उल्लेख केलेले काही प्रसंग अथवा वाद हे अगदीच मर्यादित आहेत. याहीशिवाय भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावेळी शिवसैनिकांना चिथावणी दिल्याने उखडली गेलेली खेळपट्टी, त्यांनी देशातील एका अल्पसंख्याक समुदयाबद्दल काढलेले जाहीर उद्गार, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट (1993) प्रकरणात अंडर्वल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचे नाव आल्यानंतर एकदा जाहीर व्यसापीठावरुन बोलताना 'तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी' असे केलेले वक्तव्य अशा एक ना अनेक विधानांनी बाळासाहेब ठाकरे नेहमीच वादग्रस्त नेते म्हणून चर्चेत राहिले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या वादांच्या मालिकेचा घेतलेला अल्पसा आढावा.