Shiv Sainiks Vs Shinde Camp: उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये डोंबिवली शाखेत राडा
या कार्यकर्त्यांनी या शाखेत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रतिमा लावण्याचा प्रयत्न केला. याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून जोरदार प्रतिकार झाला. यावेळी दोन्ही गटांमध्ये तुफान राडा झाला.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) गट असा सामना आता स्थानिक पातळीवरही पाहायला मिळतो आहे. दोन्ही गटातील संघर्ष आज (2 ऑगस्ट) डोंबिवलीमध्ये पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी (Shinde Camp Party) डोंबिवली येथील मध्यवर्थी शिवसेना शाखेत ( Shivsena Dombivli Shakha) अचानक प्रवेश केला. या कार्यकर्त्यांनी या शाखेत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रतिमा लावण्याचा प्रयत्न केला. याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून जोरदार प्रतिकार झाला. यावेळी दोन्ही गटांमध्ये तुफान राडा झाला. यात दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले. दरम्यान, शिंदे समर्थकांनी सोबत आणलेल्या प्रतिमा भींतीवर लावल्याचे समजते.
ठाणे हा एकनाथ शिंदे यांच्या रुपात शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, आता एकनाथ शिंदे हे स्वत:च शिवसेनेतून वेगळे झाले आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांचा गटच शिवसेना आहे. शिवसेनेतील उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गट परस्परांविरोधात न्यायालयात गेले आहेत. न्यायालयात दोन्ही बाजूंच्या याचिकांवर उद्या (3 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. दरम्यान न्यायालयाचा निकाल काय येतो याबाबत उत्सुकता आहेच. तोवर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भीडत आहेत.
डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे यांना मानणारे कट्टर शिवसैनिक विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक यांच्यात जोरदार संघर्ष आहे. दोन्ही बाजूंनी नोंदणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परिणामी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवरील ताण वाढला आहे. (हेही वाचा, Aditya Thackeray on Tanaji Sawant: तानाजी सावंत यांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर, 'त्यांना भ्रमात राहू दे, आम्ही लक्षही देत नाही')
एकनाथ शिंदे गटाकडून डोंबिवली येथे सभासद नोंदणीसाठी मंगळवारपासून सुरुवात होत आहे. एकनाथ शिंदे गटाने डोंबिवली पूर्वेतील सर्वेश हॉल येथे ही नोंदणी राबवत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, शिवसैनिकांकडूनही या मेसेजला उत्तर देणारे मेसेज व्हायरल केले जात आहेत.