Shinde-Fadnavis-Pawar Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; उद्याचा मुहूर्त विधिमंडळाच्या प्रोटोकॉल विभागाला तयारीच्या सूचना, सूत्रांची माहिती
या मंत्रिंडळ विस्तारासाठी उद्या म्हणजे 11 जुलैचा मुहूर्त निवडण्यात आला आहे.
State Cabinet Expansion Date: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ( Shiv Sena), भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Shinde-Fadnavis-Pawar Cabinet Expansion) तिसऱ्यांदा पार पडण्याची शक्यता आहे. या मंत्रिंडळ विस्तारासाठी उद्या म्हणजे 11 जुलैचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. त्याबाबत विधिमंडळाच्या प्रोटोकॉल विभागाला तयारीच्या तशा सूचनाही देण्यात आल्याचे समजते. एबीपी माझा वृत्तवाहिनीने लाईव्ह दिलेल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, विद्यमान राज्य सरकारमधील सत्ताधारी तिन्ही राजकीय पक्षांमध्ये सत्तावाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपही पार पडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज्यसरकारमध्ये सहभाही असताना आणि त्या सरकारमध्ये मंत्री असतानाही एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि समर्थक आमदारांसह ते बाहेर पडले. त्यामुळे ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. त्यानंतर काहीच दिवस सूरतमार्गे गुवाहाटी आणि मग गोवा असा प्रवास करुन ते महाराष्ट्रात परतले. पुढे त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन राज्याचे मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. मात्र, शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप यांच्या रुपात सरकार स्थापन होऊनही त्यांनी अजित पवारयांच्या रुपात तिसरा भिडू घेतला. आता हे सरकार तीन पायांचे झाले असून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी असे हे समिकरण आहे. (हेही वाचा, Governor Nominated MLC MLA: राज्यपालनियुक्त 12 आमदार नियुत्तीचा मार्ग मोकळा, याचिकाकर्त्याला स्वतंत्र याचिका करण्यास मुभा; सुप्रिम कोर्टाचा निर्णय)
अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी राज्य सरकारमध्ये सहभागी होत थेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रचंड नाराजी असल्याची माहिती होती. त्यातच मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरुन शिंदे गटातील काही आमदारांमध्ये हाणामारी झाल्याचेही वृत्त आले होते. त्यामुळे आता नव्याने होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नेतृत्व काय तोडगा काढते याबाबत उत्सुकता होती. सत्ताधारी तिन्ही राजकीय पक्षांनी नेमका काय तोडगा काढला याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. मात्र, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अनेक गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.