एल्गार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानी कुठेही असला तरी शोधून अटक करु- गृहमंत्री अनिल देशमुख

पुण्यातील एल्गार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानी याला कुठेही असला तरी शोधून अटक करु, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

पुण्यातील (Pune) एल्गार परिषदेत (Elgar Parishad) आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानी (Sharjeel Usmani) याला कुठेही असला तरी शोधून अटक करु, असे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी ट्विट करत म्हटले आहे. सध्या तो महाराष्ट्राबाहेर असून बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, असे त्यांनी म्हटले आहे. तसंच त्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यांची व्हिडिओ क्लिप पोलिसांनी तपासली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

ट्विटद्वारे शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत त्यांनी म्हटले की, "पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडिओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो महाराष्ट्राबाहेर आहे आणि त्याचा शोध सुरु आहे." (पुणे: Sharjeel Usmani च्या एल्गार परिषदेतील प्रक्षोभक विधानानंतर स्वारगेट पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल)

अनिल देशमुख ट्विट:

30 जानेवारी रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. परिषेदेतील भाषणात उस्मानी याने आजचा हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे. असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर पुण्यातील स्वारगेट पोलिस स्थानकात त्याच्याविरुद्ध 152 अ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत शर्जीलला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शर्जीलला अटक करा अन्यथा आंदोलन करु, असा इशारा दिला होता. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून शर्जीलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर कोणतीही कारवाई करणार नाही, याची खात्री असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.