पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या Azadi ka Amrut Mahotsav चे शरद पवार यांच्याकडून स्वागत; म्हणाले, या उपक्रमात सहभागी असल्याचा मला अभिमान वाटतो
या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचे कृतज्ञतेने स्मरण करून 'आझादी का अमृत महोत्सव' कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो, असंही पवार यांनी म्हटलं आहे.
Azadi ka Amrut Mahotsav: स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये 'आझादी का अमृत महोत्सव' (Azadi ka Amrut Mahotsav) सुरू केला. राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी या उपक्रमाचे स्वागत करत अमृत महोत्सव कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत. पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून अमृत महोत्सव कार्यक्रमाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारत सरकारने स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'आझादी का अमृत महोत्सव' कार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम संपूर्ण राष्ट्रामध्ये जन-उत्सव म्हणून साजरे करण्याच्या कल्पनेचे मी मनापासून स्वागत करतो, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साबरमती आश्रमातून आझादी का अमृत महोत्सव या मोहिमेला प्रारंभ केला. 15 ऑगस्ट 2022 च्या 75 आठवड्यांपूर्वी आज 12 मार्च रोजी या कार्यक्रमाची सुरूवात होत आहे. (वाचा - Sharad Pawar Birthday Celebration: पवार कुटुंबीयांनी शरद पवारांचे 80 व्या वाढदिवसानिमित्त केले खास औक्षण (Watch Video))
आझादी का अमृत महोत्सव संबंधित सर्व कार्यक्रम भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केले जातील. आपल्या देशाच्या सन्मान आणि भव्य इतिहासाचे गौरव करणाऱ्या या उपक्रमात सहभागी असल्याने मला अत्यंत अभिमान वाटतो, अशी राष्ट्रभावनादेखील शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास देशातील महान स्वातंत्र्य सैनिकांचा संघर्ष, बलिदान आणि शहिदांची आठवण करून देतो. या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचे कृतज्ञतेने स्मरण करून 'आझादी का अमृत महोत्सव' कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो, असंही पवार यांनी म्हटलं आहे.