नाशिक: पिकाची नुकसान पाहण्यासाठी शरद पवार पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर
यावेळी पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज नाशिक येथील परतीच्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले. राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. परंतु, पवार मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आहेत. पवार यांनी इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी शरद पवार यांना परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची व्यथा सांगितली. तसेच अद्याप सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केली नसल्याने नाराजीही व्यक्त केली. सरकारने बागायती आणि जिरायती असा भेदभाव न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, असं पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
शरद पवार यांचे ट्विट -
पवार आज जिल्ह्यातील इतर ठिकाणीही नुकसान पाहणी करणार आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे नाशिक जिल्ह्यातील तब्बल ३ लाखांहून अधिक हेक्टर म्हणजे निम्म्या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मका, द्राक्ष, सोयाबीन, लेट खरीप कांदा पिकांना सर्वाधिक फटका बसला. नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाचा सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा तालुक्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. बागलाण, निफाड, दिंडोरी परिसरांतील द्राक्ष बागांना अधिक फटका बसला आहे. पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा - सावधान! पुण्यात पुढचे 48 तास मुसळधार पाऊस
दरम्यान, आज पवार यांच्या भेटीआधीच कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत नाशिकमध्ये पोहचले. नाशिकजवळ असलेल्या वडाळी भोई गावात जाऊन खोत यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. सरकारने लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. तसेच सदाभाऊ खोत यांनीही शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.