Sharad Pawar Slams Centre: केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे; प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचे पथक दाखल झाले असून शोधमोहिम सुरु आहे.
शिवेसना (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ED) पथक दाखल झाले आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचे पथक दाखल झाले असून शोधमोहिम सुरु आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोपांना आणि राजकीय प्रतिक्रियांना सुरूवात झाली आहे. याच प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली. तसेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे, ते विरोधकांच्या नैराश्याचे प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी सरकारी संस्था राजकीय विरोधकांविरूद्ध वापरल्या जात आहेत. हे योग्य नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता त्यांना माहिती आहे की, ते येथे सत्तेवर येऊ शकत नाहीत. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे. हे देखील वाचा- Jaysingrao Gaikwad Quit BJP: भाजपला हादरा, आणखी एक केंद्रीय माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गळाला, शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
एएनआयचे ट्विट-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असे सांगणाऱ्या भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. जयसिंगराव गावकवाड यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक फायदा मिळणार, अशी अपेक्षा केली जात आहे.