Sharad Pawar यांचे महाराष्ट्र विधानसभा मतदानाच्या तोंडावर संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत? 'आता कोणतीच निवडणूक लढणार नाही' (Watch Video)

आता पुन्हा राज्यसभेत जायचं का? याचा आपण विचार करत असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं असल्याने आता त्यांच्या निवृत्तीच्या पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Sharad Pawar | Photo Credit- X

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांचा प्रचार जोरात सुरू झाल्यानंतर आज बारामती मध्ये नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना पुन्हा शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. सध्या शरद पवार राज्यसभेचे खासदार आहेत. अजूनही त्यांच्या खासदारकीचा दीड वर्षाचा कालावधी बाकी आहे असं असताना आता पुन्हा राज्यसभेत जायचं का? याचा आपण विचार करत असल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान लोकसभा निवडणूक किंवा अन्य कोणतीही निवडणूक येत्या काळात आपण लढणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान 84 वर्षीय शरद पवार यांनी आपण 14 वेळा निवडून आलो. कोणत्याच निवडणूकीत पराभव झाला नाही. लोकांनी  निवडूनच  दिलं पण आता निवडणूका लढणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे नकळत त्यांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले का? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार हे एक मुरब्बी राजकारणी म्हणून पाहिले जातात. 1967 साली शरद पवार बारामती मधून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. दिल्लीतही केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री, कृषीमंत्री पद भूषवलं आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव यांच्या प्रेरणेने ते राजकारणात आले. वयाच्या 24 व्या वर्षी  महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि राजकारणात त्यांचा प्रवास सुरू झाला. 1999 मध्ये शरद पवारांनी कॉंग्रेस मधून बाजूला होत स्वतःचा एनसीपी अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ची स्थापना केली.  त्यामध्येही जुलै 2023 मध्ये पुतण्या अजित पवार यांच्या बंडामुळे फूट पडली. आता शरद पवारांकडे असलेल्या पक्षाचे नाव एनसीपी शरदचंद्र पवार असे आहे.  एकूणच राजकारण आणि पक्षामधील स्थित्यंतर पाहिलेल्या शरद पवारांनी 2023 च्या पक्षाच्या वर्धापन दिनी निवृत्ती जाहीर केली होती परंतू कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करता त्यांनी माघार घेत अध्यक्ष पद स्वतः कडे ठेवत कार्याध्यक्ष हे नवं पद निर्माण करून मुलगी सुप्रिया सुळे कडे त्याची जबाबदारी दिली आहे.

दरम्यान आता बारामती या पवारांच्या होमग्राऊंड वर पवार विरूद्ध पवार ठाकले आहेत. लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंविरूद्ध अजित पवारांच्या पत्नी उभ्या होत्या तेव्हा सुप्रिया यांचा विजय झाला होता. आता विधानसभेमध्ये अजित पवारांविरूद्ध त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार उभे ठाकले आहेत. शरद पवारांनी आता बारामतीमध्ये नव्या नेतृत्त्वाची गरज असल्याचं सांगत युगेंद्रला बारामती विधानसभा मतदार संघातून विजयी करण्याचं आवाहन केले आहे.