शरद पवार हे आमचे नेते, लवकरच शिवसेना नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार: संजय राऊत

या वेळी बोलताना राज्यातील राष्ट्रपती राजवट लवकरच दूर व्हावी, यासाठी तिन्ही पक्षांची सहमती असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

Sajay Raut | (Photo Credits: ANI)

शरद पवार (Sharad Pawar) हे आमचे महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आहेत. महाराष्ट्रात उद्भवलेल्या नैसर्गिक परिस्थितीबद्दल आदानप्रधान करण्यासाठी आपण शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा केली. शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या बैठकीत चर्चा झाली नाही तर, त्याबाबत आम्ही कसे बोलायचे, असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत ( Sajay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. या वेळी बोलताना राज्यातील राष्ट्रपती राजवट लवकरच दूर व्हावी, यासाठी तिन्ही पक्षांची सहमती असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

आगामी काळात राज्यात शिवसेना नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यास शिवसेना कारणीभूत नाही. तर, सरकार स्थापन करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती, जे राज्यातील सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजेच क्रमांक एकचा पक्ष होते त्यांनी सरकारस्थापनेपासून पळ काढला, असे म्हणत राऊत यांनी नामोल्लेख टाळत भाजपला टोला लगावला. (हेही वाचा, दिल्ली: सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? सरकार स्थापन होणार की नाही? काय म्हणाले शरद पवार?)

दरम्यान, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी आहे. त्यामुळे त्या पक्षांतील चर्चा हा त्यांचा अंतर्गत मामला आहे. त्यावर आम्ही कसे काय भाष्य करणार ? असा सवाल उपस्थित करत लवकरच राज्यातील राष्ट्रपती राजवट दूर होईल. शिवसेना नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असे संजय राऊत यांनी या वेळी सांगितले.

एएनआय ट्विट

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकालानुसार संख्याबळाचा विचार करता भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी युती करुन निवडणूक लढलेल्या भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांची आहे. मात्र, मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समसमान वाटप यांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आणि सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.