Sharad Pawar Discusses With Devendra Fadnavis: बीड आणि परभणीच्या घटनांबाबत शरद पवारांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा; तत्वरीत कारवाईची केली मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूची तातडीने दखल घेण्यासाठी राष्ट्रवादीचे (सपा) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Sharad Pawar | Photo Credit- X

Sharad Pawar Discusses With Devendra Fadnavis: बीड आणि परभणीच्या हिंसक घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातील राजकारण तापलं आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख यांच्या हत्येचा (Santosh Deshmukh Murder Case) मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूची तातडीने दखल घेण्यासाठी राष्ट्रवादीचे (सपा) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तथापी, शनिवारी पवार यांनी देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या संवादादरम्यान पवारांनी या घटनेच्या गंभीरतेबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर -

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही प्रकरणांची न्यायालयीन चौकशी आणि पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. पुण्यातील भीमथडी जत्रेला उपस्थित असताना शरद पवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करून फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेचा पुनरुच्चार केला. याशिवाय, शरद पवारांनी दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे फडणवीस यांना निमंत्रण दिले. (हेही वाचा -Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख यांच्या कुटुंबास शरद पवार यांची भेट, उचलली मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी)

सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू -

संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्यानंतर गेल्या आठवड्यात परभणीत निदर्शने करण्यात आली होती. या घटनेच्या संदर्भात अटक करण्यात आलेल्या सुर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असे या मृताचे नाव आहे. तो परभणीतील मोंढा परिसरातील शंकरनगर येथे भाड्याच्या घरात राहत होता. (हेही वाचा, Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण, आतापर्यंत काय घडले? देवेंद्र फडणवीस सभागृहात काय म्हणाले?)

सूर्यवंशी हे वडार समाजाचे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली, त्यानंतर तुरुंग प्रशासनाने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.