Sharad Pawar Declines Z-Plus Security: शरद पवारांनी नाकारली केंद्राने दिलेली झेड प्लस सुरक्षा; व्यक्त केला हेरगिरी करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय

शरद पवार यांनी दिल्लीतील त्यांच्या घरात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करणे, शहरात प्रवास करण्यासाठी वापरत असलेले वाहन बदलणे आणि दोन सुरक्षा कर्मचारी त्यांना त्यांच्या वाहनात घेऊन जाण्याचे प्रस्ताव नाकारले आहेत.

Sharad Pawar | Photo Credit- X

Sharad Pawar Declines Z-Plus Security: राष्ट्रवादी काँग्रेस- एसपीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar- SP) यांनी आज गृह मंत्रालयाने दिलेली झेड प्लस श्रेणीची सुरक्षा (Z-Plus Security) घेण्यास नकार दिला. काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी 58 सीआरपीएफ कमांडो तैनात केले जाणार होते. पवार यांनी सीआरपीएफ अधिकाऱ्यांना परत केल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरक्षा यंत्रणांनी सुचविलेल्या काही उपायांना त्यांनी नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. 83 वर्षीय पवार यांनी दिल्लीतील त्यांच्या घरात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करणे, शहरात प्रवास करण्यासाठी वापरत असलेले वाहन बदलणे आणि दोन सुरक्षा कर्मचारी त्यांना त्यांच्या वाहनात घेऊन जाण्याचे प्रस्ताव नाकारले आहेत.

मात्र, सुरक्षेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून शरद पवार यांनी दिल्लीतील त्यांच्या घराच्या सीमा भिंतीची उंची वाढवण्यास होकार दिला आहे. पवार यांनी शुक्रवारी सुरक्षा यंत्रणा- सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत दिल्ली अग्निशमन सेवा, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, नवी दिल्ली नगर परिषद आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

अधिकृत सूत्रांनी 21 ऑगस्ट रोजी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले होते की, केंद्राने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. पवार यांच्या झेड प्लस सुरक्षा कवचाचा एक भाग म्हणून, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या 58 सशस्त्र कर्मचाऱ्यांची तुकडी नियुक्त करण्यात आली होती. त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले होते. (हेही वाचा: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक Mohan Bhagwat यांच्या सुरक्षेत वाढ; पंतप्रधान मोदी, अमित शाहांच्या दर्जाची सुरक्षा)

मात्र केंद्राकडून सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवार यांनी 23 ऑगस्ट रोजी हेरगिरीची भीती व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, ‘गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने मला सांगितले की, सरकारने तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी त्यापैकी एक आहे. निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे माझ्याबद्दलची खरी माहिती मिळवण्याचे हे एक माध्यम असू शकते.’ आता गृह मंत्रालयाने दिलेली झेड प्लस श्रेणीची सुरक्षा घेण्यास शरद पवार यांनी आज नकार दिला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी आपल्या विरोधात कोणत्या प्रकारची धमकी आहे हे आपण आधी तपासू, त्यानंतरच सुरक्षा घेण्याचा विचार करू, असे सांगितले आहे. यासंदर्भात त्यांनी गृह मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांकडून माहितीही मागवली आहे.