शाहरुख खान NCB चं पुढील टार्गेट; नवाब मलिक यांचा पुन्हा एकदा हल्लाबोल
यावरुन एकच वादंग उठला असताना राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीच्या कारवाईवर हल्लाबोल केला आहे.
कॉर्डेलिया क्रूझवरील (Cordelia Cruise) ड्रग्स पार्टीवर (Drug Party) एनसीबीने (NCB) छापा टाकत शाहरुख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक केली. यावरुन एकच वादंग उठला असताना राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा एनसीबीच्या कारवाईवर हल्लाबोल केला आहे. शाहरुख खान एनसीबीचं पुढील टार्गेट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच एनसीबी आणि भाजप (BJP) मिळून बॉलिवूडला बदनाम करत असल्याचंही ते म्हणाले.
"एनसीबी पब्लिसिटीसाठी बॉलिवूडमधील लोकांना बोलावत आहेत. रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण असेल, अर्जुन रामपाल अशा किती लोकांना बोलवून दिवसभर मीडियामध्ये बातमी चालवण्यात आली. आता शाहरुख खान हा पुढचा टार्गेट आहे. एक महिन्यापासून सांगण्यात येत होतं. त्याच्या मुलाला यात गोवण्यात आलं, अडकवण्यात आलं, हे सगळं फर्जीवाडा आहे," असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. (Aryan Khan Drug Case: नवाब मलिक यांच्या आरोपांचे NCB ने खंडन; 'राष्ट्रवादीला कोर्टात जायचे असेल तर आम्ही तिथे उत्तर देऊ'- DG Gyaneshwar Singh)
ANI Tweet:
ज्या राज्यांमध्ये भाजपविरोधी सरकार आहे. त्या सरकरांना त्रास देण्याचं काम सुरु आहे. पश्चिम बंगालसारखी परिस्थिती आपल्या राज्यात निर्माण झाली आहे. पण यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे नेते घाबरणार नाहीत. आम्ही अधिक ताकदीने याला सामोरे जावू, असंही मलिक यांनी सांगितलं. तसंच मनिष भानुशाली यांच्यावरुन आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी यावेळी सडेतोड उत्तर दिले.
दरम्यान, यापूर्वी नवाब मलिक यांनी कॉर्डेलिया क्रूझवरील एनसीबीचा छापा हा फेक असल्याचे म्हटले होते. तसंच या पार्टीत ड्रग्स सापडलेच नाहीत, असा दावाही त्यांनी केला होता. मात्र मलिक यांनी केलेले सर्व आरोप एनसीबीने फेटाळून लावले आहेत.