COVID 19 In Maharashtra: कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
त्यामुळे कामगारांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भारतासह महाराष्ट्रामध्ये कोविड 19 ची दुसरी लाट प्रचंड वेगाने आली आहे. अशामध्ये दिवसागणिक रूग्णसंख्येत स्फोटक वाढ होत असल्याने राज्यात ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत कडक नियम लावण्यात आले आहेत. कलम 144 लागू केल्याने आता संचारबंदी आहे. परिणामी अनेक व्यापार, धंदे पुन्हा मंदावले आहेत. याचा अर्थचक्राला धक्का बसू नये म्हणून प्रशासनाने पुन्हा पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान त्याबाबत काल मुख्यमंत्री कामगार संघटनांशी देखील बोलले आहेत.
कोविड संसर्गाशी मुकाबला करत असताना राज्यातील उद्योगधंदे सुरु राहण्याबरोबरच राज्याचं अर्थचक्र सुरु राहणं आवश्यक आहे. त्यामुळे कामगारांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती (Covid Vigilance Committee) स्थापन करण्यात यावी, अशी एक महत्त्वाची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (नक्की वाचा: COVID 19 सुसंगत औद्योगिक धोरणांसाठी लवकरच 'उद्योग टास्क फोर्स'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिवांना निर्देश).
मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील कामगार संघटनांबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन कामगारांना काही महत्त्वपूर्ण नियमांचं पालन करणं किती आवश्यक आहे हे पटवून द्यावं असं त्यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी देखील लॉकडाऊन हा अंतिम पर्याय म्हणून विचार करा. 1 मे पासून सुरू होणार्या लसीकरणामध्ये सहभागी होत श्रमिकांनाही तातडीने लस घेण्यासाठी तयार करा म्हणजे ते शहरातील काम सोडून गावी परतणार नाहीत आणि काम धंदे बंद होणार नाहीत असं म्हटलं होतं.