Serum Institute Fire: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट येथे लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू; इमारतीत चालू असलेल्या वेल्डिंगमुळे आग लागल्याचा अंदाज

अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग नियंत्रणात आली असल्याची माहिती मिळत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कोरोना लस कोव्हिशील्ड बनवत आहे

Serum Institute Fire | (Photo Credits: ANI)

गुरुवारी महाराष्ट्रातील पुणे (Pune) येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (Serum Institute of India) नवीन प्लांटमध्ये आग लागली. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग नियंत्रणात आली असल्याची माहिती मिळत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कोरोना लस कोव्हिशील्ड बनवत आहे, जी लस भारतासह अनेक देशांमध्ये पुरविली जात आहे. या आगीच्या घटनेत कोरोना लसीचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. संस्थेच्या नवीन इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर आग लागली होती. मात्र या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे,  त्याचा परिसर सुमारे 100 एकर क्षेत्रात पसरलेला आहे. पुण्यातील मांजरीस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नवीन प्लांटमध्ये ही आग लागली होती. गेल्या वर्षी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या प्लांटचे उद्घाटन झाले होते, परंतु या प्लांटमध्ये लसीचे उत्पादन सुरू झाले नव्हते. आज दुपारी साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. त्यानंतर इमारतीमधून धुराचे लोण उठले. अग्निशमन दलाला इमारतीमधील 9 पैकी 4 जणांना वाचवण्यात यश आले मात्र 5 जणांचा मृत्यू झाला.

याबाबत पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेले पाच लोक कदाचित बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील कामगार होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही परंतु इमारतीत चालू असलेल्या वेल्डिंगमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. इमारतीतून चार जणांना बाहेर काढण्यात यश आले पण आग नियंत्रणात आल्यावर जवानांकडून पाच मृतदेह सापडले. (हेही वाचा: सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली का लावली? वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली शंका)

घडलेल्या घटनेबाबत सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी-मालक अदर पूनावाला यांनीही दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, आगीच्या तपासणीदरम्यान आम्हाला समजले की यामध्ये जीवितहानी झाली आहे. निधन झालेल्या कुटूंबियांसमवेत आमच्या संवेदना आहेत.’ या घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.