मुंबई: 10 रुपयात मटार विकल्यामुळे ग्राहकांकडून विक्रेत्याची हत्या; आरोपीं अटकेत
ही घटना मुंबईतील (Mumbai) मानखूर्द (Mankhurd) येथे सोमवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मटार महाग विकल्यामुळे संतापलेल्या ग्राहकांकडून भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना मुंबईतील (Mumbai) मानखूर्द (Mankhurd) येथे सोमवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या बाहेरील सायन-पनवेल हायवे (Sion-Panvel Highway) ब्रिजखाली हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर आजुबाजूच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
रामखिलान यादव असे भाजी विक्रेत्याचे नाव आहे. रामखिलान मानखुर्द रेल्वे स्थानकाच्याबाहेर भाजी विक्री करत असे. सोमवारी रामखिलाना याने मटार विकायला आणली होती. रामखिलानने मटारचे 10 रुपयाचे छोटे-छोटे वाटे करुन विक्रीसाठी ठेवले होते. त्यावेळी अभिषेक धुमाळ आणि साहिल खराडे हे दोघे आरोपी रामखिलान याच्याकडे मटार खरेदी करण्यासाठी आले होते. मटारचा एक वाटा घेत दोन्ही आरोपींनी त्यात आणखी मटार टाकायला सांगितले. भाजी महाग असल्याचे कारण सांगून रामखिलान याने आणखी मटार टाकण्यास नकार दिला. यावरुन अभिषेक आणि साहिल दोघेही रामखिलान याच्यासह हुज्जत घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यात रामखिलान याचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा-मुंबई: वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची कमाठीपूरा येथे आर्थिक वादातून हत्या
मानखुर्द पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर वरील घटनाक्रम उघडकीस आला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपी हे मामा- भाचे असून आंबेडकरनगर येथील रहवासी आहेत.