पुण्यात पदवीदान समारंभाला ब्रिटीशकालीन पोशाखाऐवजी कुडता आणि पायजमा; मात्र पगडीवरून रंगला वाद
या समारंभात वाद रंगला तो पगडीवरून, पुणेरी पगडी की फुले पगडी असा हा वाद होता.
Pune : पुणे... महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. सारसबाग, तुळशीबाग, दगडूशेट, मानाचे गणपती, बालगंधर्व अशा पुण्याच्या अनेक गोष्टी जगात प्रसिद्ध आहेत. यात सर्वात तोऱ्यात मिरवते ती पुण्याची पगडी. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) 114 वा पदवीदान समारंभ संपन्न झाला. या समारंभात वाद रंगला तो पगडीवरून, पुणेरी पगडी (Puneri Pagadi) की फुले पगडी (Phule Pagadi) असा हा वाद होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान सोहळ्यात काळा घोळदार गाऊन आणि टोपी या ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ ऐवजी कुडता-पायजमा-पगडी असा पारंपरिक पोशाख देण्यात आला होता. यावेळी 4 विद्यार्थ्यांनी पुणेरी पगडी नको असा वाद घातला.
आता पर्यंत पदवीदान सोहळ्यात काळा घोळदार गाऊन आणि टोपी असा ब्रिटीशकालीन पोशाख वापरला जायचा. मात्र यावर्षी विद्यापीठाने हा पोशाख बदलून कुर्ता-पायजमा, उपरणे आणि पगडी असा पारंपरिक पोशाख देण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी भारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंह यांनी ही ब्रिटिशकालीन पद्धत बंद करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानुसार सावित्रीबाई फुले विद्यापीठाने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शुक्रवारी पदवीदान समारंभ सुरु असताना चार विद्यार्थ्यांनी पुणेरी पगडीचा मुद्दा उपस्थित करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा : हेल्मेटसक्ती विरोधात पुणेकरांची पगडी घालून बाईक रॅली)
याधीही डॉ. राम ताकवले कुलगुरू असताना १९81-82 च्या सुमारास हा पदवीदान समारंभाच्या पोशाखात बदल करण्यात आला होता. पु.ल.देशपांडे यांनी हा बदल सुचवला होता. मात्र काही काळानंतर पुन्हा ब्रिटीशकालीन पोशाख वापरण्यास सुरुवात झाली.