Satara मध्ये 3 चिमुकल्या बहिणींना विषबाधा; तीन दिवसांत तिघांचाही संशयास्पद मृत्यू
फुड पॉयजनिंगमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड (Karad) येथे तीन बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. फुड पॉयजनिंगमुळे (Food Poisoning) मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले. आयुषी शिवानंद सासवे (3), आस्था शिवानंद सासवे (9), आरुषी शिवानंद सासवे (8) अशी या तिघी बहिणींची नावे आहेत. रविवारी रात्री आपल्या पालकांसोबत या मुलींनी घरीच जेवण केले. त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्याने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मागील तीन दिवसांत तिघींचाही मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या पालकांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. (परभणी: पूर्णा येथील मागासवर्गीय शासकीय निवासी शाळेतील 35 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा)
कराड मधील सैदापूर येथे राहणाऱ्या सासवे कुटुंबियांनी रविवारी रात्री घरीच जेवण केले. वांग्याची भाजी आणि बासुंदी असा बेत होता. त्यांनी बासुंदी बाहेरून मागवली होती. मात्र रात्री झोपायला जाताना त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला, अशी माहिती कराड सिटी पोलिस स्टेशनचे सिनियर इंन्स्पेक्टर बी.आर. पाटील यांनी दिली. (विजेच्या धक्क्याने बहिण-भावाचा दुर्दैवी अंत, कर्जत शहरातील धक्कादायक घटना)
पुढे त्यांनी सांगितले की, सकाळी ते स्थानिक डॉक्टरांकडे गेले. मात्र तिन्ही मुलींची प्रकृती खूपच बिघडल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यापैकी एक मुलगी मंगळवारी रात्री मृत पावली. तर दोघींचा बुधवारी आणि गुरुवारी मृत्यू झाला.
गुरुवारपर्यंत एका मुलीची तब्बेत सुधारली होती आणि ती बोलू लागली होती. मात्र अचानक तिची तब्बेत बिघडून गुरुवारी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, बासुंदी खाल्ल्याने फूड पॉयजनिंग झाल्याचा प्राथमिक अंदाज असून आम्ही त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तपासणीतून आलेल्या रिपोर्ट्च्या आधारे पुढील तपास करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.