Satara Lok Sabha Election 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदेंमध्ये काटे की टक्कर, कोणाला यश मिळणार?

या मतदारसंघातून महायुतीकडून भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवली. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली आहे.

Photo Credit- Facebook

Satara Lok Sabha Election 2024: सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये (Satara Lok Sabha Constituency) यावेळी दुहेरी लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघातून महायुतीकडून भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी निवडणूक लढवली. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी निवडणूक लढवली आहे. आपआपल्या उमेदवारासाठी दोन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. (हेही वाचा: Nagpur Lok Sabha Election 2024: नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी विजयाची करणार हॅट्रिक; विकास ठाकरेंपुढे मोठं आव्हान)

साताऱ्यामध्ये महायुतीकडून उमेदवार देण्यावरून मोठा सस्पेंस ठेवण्यात आला होता. उदयनराजे भोसले यांना मोठ्या उशिराने उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. असे असले तरी देखील या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार जिंकून यावा यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. या मतदारसंघामध्ये 2019 मध्ये झालेला पराभव लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा मतदारसंघ आपल्याकडे काबिज करण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळालेल्या शशिकांत शिंदे यांनी या मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार केला. त्यांनी प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.

सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये 57.38 टक्के मतदान झाले आहे. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. महत्वाचे म्हणजे या मतदारसंघामध्ये 'बिग बॉस' फेम अभिनेता अभिजीत बिचुकले देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघामध्ये प्रमुख लढत उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये झाली. आता सातारकर नेमकी कोणाला पसंती देतात हे 4 जूनला कळेल.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये 2009 पासून ते 2019 पर्यंत उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार राहिले. पण 2019 मध्येच उदयनराजे भोसले यांनी नाराज होत राष्ट्रवादीला रामराम ठोकत खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुक झाली होती. ज्यात त्यांना पराभव पत्करावा लागाल. राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे 6,36,320 मतांनी विजयी झाले होते.